व्यक्तिपूजा नव्हे, विचारपूजा हीच समाजपरिवर्तनाची खरी दिशा

shivrajya patra

भारतीय संत परंपरा, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी व्यक्तिपूजेपेक्षा सत्य, विवेक, समता आणि मानवकल्याण या मूल्यांना अधिक महत्त्व दिले.

आजच्या काळात अनेक ठिकाणी तथाकथित गुरूंचे प्रस्थ वाढताना दिसते. अशा परिस्थितीत संत तुकाराम महाराजांसारख्या संतांच्या विचारांचे पुनर्वाचन करण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते.

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजातील अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि खोट्या अध्यात्मावर कठोर प्रहार केला. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे—

"एक करिती गुरु गुरु । भोवती भारु शिष्यांचा ।।
पुस नाही पाय चार । माणसे परी कुत्रे ती ।।"

या अभंगातून तुकोबारायांनी स्वतःभोवती शिष्यांचा मेळा जमवून स्वतःचे उदात्तीकरण करणाऱ्या ढोंगी गुरूंची तीव्र शब्दांत चिकित्सा केली आहे.

त्यांच्या या विचारांचा उद्देश समाजाला विवेकाची दिशा देणे हा होता. भक्ती म्हणजे अंधानुकरण नव्हे, तर सत्याचा शोध, आत्मपरीक्षण आणि सदाचार असे त्यांनी आपल्या अभंगांतून वारंवार सांगितले.

भारतीय समाजपरिवर्तनाच्या इतिहासाकडे पाहिले असता अनेक महापुरुषांनी व्यक्तीपेक्षा विचारांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांतून प्रेरणा घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा मार्ग जगासमोर मांडला. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याला राजसत्तेच्या माध्यमातून व्यापक स्वरूप दिले.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ, शहाजीराजे तसेच तत्कालीन संत आणि विविध आध्यात्मिक परंपरांतील प्रेरणांचा प्रभाव इतिहासात नमूद केला जातो.

या सर्व उदाहरणांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, समाजातील महान व्यक्तींनी अंधभक्तीचा मार्ग स्वीकारला नाही; त्यांनी विवेक, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या विचारांना जीवनाचे अधिष्ठान मानले.

आजच्या काळात समाजाला सर्वाधिक गरज आहे ती विचारांच्या नेतृत्वाची. व्यक्ती नश्वर असते; परंतु विचार अमर असतात. एखाद्या व्यक्तीची अंधभक्ती करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार, महात्मा फुले यांची शिक्षणक्रांती, राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि समतेचे तत्त्वज्ञान, संत तुकाराम महाराजांचा विवेकनिष्ठ भक्तीमार्ग आणि भगवान गौतम बुद्धांचा करुणा व प्रज्ञेचा संदेश यांचा स्वीकार करणे हीच खरी समाजसेवा ठरेल.

आजच्या युवकांनी स्वतःला कोणाच्या व्यक्तिपूजेत अडकवून न घेता ज्ञान, विज्ञान, संविधान, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांना जीवनात स्थान दिले पाहिजे. कारण व्यक्तिपूजा माणसाला परावलंबी बनवते; तर विचारपूजा माणसाला स्वाभिमानी, विवेकी, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख बनवते.

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता, बंधुभाव आणि विवेकनिष्ठ जीवनमूल्ये रुजविणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांचे विचार हे केवळ स्मरणासाठी नसून आचरणासाठी आहेत. त्यांच्या विचारांचा स्वीकार केला तरच सामाजिक परिवर्तनाला खरी गती मिळेल आणि सशक्त, समताधिष्ठित व प्रबुद्ध भारताची निर्मिती होईल.

– डॉ. विकास पाटील

प्रवक्ता – मराठा सेवा संघ,
प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद.
झोनल ऑफिसर- समर्थ आरोग्य फाऊंडेशन.
***

To Top