सराईत आंतर जिल्हा मोटार सायकल चोरटा गजाआड; पोपटासारखा बोलत काढून दिल्या 14 मोटार सायकली

shivrajya patra

विविध जिल्ह्यातील 06, 55, 000 रुपये किंमतीच्या 14 मोटार सायकली हस्तगत

सोलापूर शहर गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी

सोलापूर : शहर गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरीत आंतरजिल्हा चोरटा रविवारी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलीच्या चौकशीपासून सुरु झालेलं नाट्य कर्नाटक राज्यातील जेवरगी (कलबुर्गी) जिल्ह्यात थांबलं. सत्यवान रामहरी भोसले (वय-32 वर्षे) असं या सराईत चोरट्याचं नांव आहे. त्यानं तपासादरम्यान पोपटासारखा बोलत चोरीच्या गुन्ह्यातील 14 मोटार सायकली काढून दिल्या असून त्या वाहनांची किंमत 06, 55, 000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय.

शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.)  डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सी.सी.टी.व्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन, मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराच्या मागावर होते.

शुक्रवारी,  05 जून रोजी फौजदार चावडी पो.स्टेशनकडील भा. न्या. सं. 2023 कलम 303 (2) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. हा गुन्हा घडल्यानंतर स. पो. नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदारानी त्या घटनास्थळी भेट देऊन सी. सी. टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन हा गुन्हा कोणी केला आहे? याबाबत माहिती घेत होते. 

संशयीत आरोपीचा शोध घेत असताना स. पो. नि. खेडकर व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपूत व इम्रान जमादार यांना रविवारी, 12 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम चोरीची होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल घेऊन हैद्राबाद रोडवर मार्केट यार्डजवळ थांबला असल्याचे समजले. 

त्या माहितीची खात्री करून स. पो. नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडं इसमास नाव व पत्ता विचारता, त्याने त्याचं नाव सत्यवान रामहरी भोसले (वय-32 वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. मु. पो. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर.) असं असल्याचे सांगितले. 

पथकाने त्यास मोटार सायकलच्या मालकी हक्काबाबत चौकशी केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यावेळी पथकाने त्याच्याकडं कसून चौकशी केली असता, त्याने ती मोटार सायकल काही दिवसांपूर्वी वसंत विहार परिसरातून चोरी केल्याचे कबुली दिली. त्या मोटार सायकलचे असलेल्या आरटीओ क्रमांक -MH 13/DK 5511, चेसीस नंबर व इंजिन नंबर वरुन खात्री केली असता, ती मोटार सायकल फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली.

त्यानंतर संशयीत इसमास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने मागील काही दिवसांमध्ये सातारा, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटक राज्यातून आणखी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. 

त्यामुळे स.पो.नि. खेडकर यांनी त्यास उपरोक्त दाखल गुन्ह्यात अटक केली. त्या गुन्ह्याचे अधिक तपासामध्ये त्याने आणखी 13 मोटार सायकली काढून दिल्या, असून त्या पंचनाम्याने हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील स. पो. नि. खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहर हद्दीतील 07, धाराशिव जिल्ह्यातील 05, सातारा जिल्ह्यातील 01 आणि कर्नाटक राज्यातील 01 असे एकूण 14 गुन्हे आंतरजिल्हा मोटार सायकल चोराकडून उघडकीस आणून त्याच्याकडून एकूण 6, 55, 000 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स. पो. नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो. स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.

To Top