सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) परिसरमध्ये अंतर्गत रस्त्यावरील मोठमोठ्या खड्डयामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत व नव्याने सी. सी. रस्ते तयार करण्यात यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले यांनी सिव्हील रुग्णालयात स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला होणारा त्रास शासनाला कळाळा आणि जाग यावी, म्हणून लक्ष वेधण्यासाठी अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये शहर, जिल्हा तसेच राज्यातील विविध भागांतून हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉर्ड कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे. रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात ने-आण करावी लागते. मात्र, हॉस्पिटल परिसरातील सर्व रस्ते अत्यंत खराब झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. 
त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना व प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, म्हणून रुग्णवाहिकेतून सिव्हीलमध्ये जलद गतीने आणताना सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे खड्डयातील पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. यामध्ये रुग्ण दगावल्यास सिव्हील प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने यावेळीदिला आहे.
****
