पुण्यात 26 मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वर्धापन दिनी पुरस्कारचे वितरण
सोलापूर : मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त यंदाच्या वर्षीचे राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मसाप दक्षिण शाखेला निवडण्यात आलं आहे. मंगळवारी, 26 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मसाप पुणे चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहिर केले. त्याबाबतचे पत्र मसाप दक्षिण शाखेला प्राप्त झालं आहे.
मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी गेल्या 120 वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यरत आहे. अनेक थोर लेखकांनी आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ देऊन वाड्मय सेवकांची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारूपाला आणलं आहे.
साहित्य परिषदेचं कार्यक्षेत्र केवळ पुणे शहर वा जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्र साहित्य परिषदेने राज्यातील अनेक जिल्ह्यात शाखांचे जाळे पसरवले. त्यातच सोलापूरमध्ये सर्वाधिक शाखा निर्माण झाल्या. दक्षिण सोलापूर शाखेने गेल्या अनेक वर्षात शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, लोकजागृती असे विविध उपक्रम घेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने पहाटेच्या प्रवचनमाला ही आगळी-वेगळी संकल्पना सत्यात आणून ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांची 'अमृतवाणी' हा कार्यक्रम अखंडपणे सुरू ठेऊन यशस्वी केला. महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक कवी विं.दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत विंदा एक स्मरणसाखळी हा बहारदार कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला.
मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या तीन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात आणि वेगळेपणाने करण्यात आले.
त्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका, सुप्रसिध्द निवेदिका ज्योती आंबेकर यांचे भाषण कला शिबीर हे शिबीर आणि महिलांसाठी राज्यस्तरीय पाककला शिबीर, ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांचा मिश्कीली आणि कविता, कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावरील आधारीत असलेला अनवट शांताबाई, जगप्रसिध्द लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ए आय ची जादू आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान, विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत तर नव वकीलांना प्रेरणादायी ठरली. 
इमॅजिनियस स्टुडिओ, कोल्हापूर प्रस्तुत हिंदी गाण्यावर आधारीत दास्तान ए इश्क कार्यक्रम, पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे व्याख्यान, नरहर कुरुंदकर एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोग, भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यानाने तर गर्दीचा रेकॉर्ड कायम केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संघ यात्रेनिमित्त 'संघ गंगा के तीन भगीरथ' हे नाटक, 'स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती' या विषयावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर भक्त शरद पोंक्षे यांचे व्याखान, 'सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे' या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून सोलापूरचे कर्तुत्ववान तीन सुपुत्र, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना एकाच मंचावर आणून एकत्रीतपणे त्यांची मुलाखत सोलापूरचे चौथे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी घेऊन राजकीय प्रगल्भता कशी असते, हेच दाखवून दिले.
देशभरात गाजलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम 'आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका डॉ. अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी घेतली.
'श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त' या विषयावर सविस्तर माहिती डॉ. रमा गोळवकर यांनी यावेळी आपल्या व्याख्यानातून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर व्याख्यानातून योगेश सोमण यांनी विस्तृतपणे माहिती दिली. सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन तर नेहमी होते, परंतु कारागृहातील बंदी असलेल्यांना काही वेळ विरंगुळा मिळावा, या हेतुने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, दक्षिण सोलापूरच्या वतीने 'हास्यसम्राट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशा विविध उपक्रमांचं आयोजन सोलापुरकरांसाठी आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन, शिस्तबध्दता, तेच तेच पणा न आणता विविधता आणून प्रत्येक वेळी नवनवीन संकल्पना राबवणे, जास्तीत-जास्त आणि नवनवे प्रेक्षकांपर्यत कार्यक्रम पाहोचवणे, पारंपारिक पध्दती सोबतच आधुनिकतेचा समावेश करणे, कार्यक्रमाचे आयोजन करताना वेळेचे योग्य नियोजन आणि दिलेल्या वेळेतच कार्यक्रम सुरू करून समारोप करण्याची परंपरा महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण शाखेने आजवर कायम ठेवली आहे.
वर्षभरात राबवलेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करून वेळोवेळी त्याचा हिशोब, ऑडीट आणि अहवाल तयार करून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडे वेळेत पाठवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने दक्षिण सोलापूर शाखेला यंदाचा कै. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा मंगळवारी, 26 मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सोलापुरकरांच्या प्रेमामुळेच हा पुरस्कार - रेणुका महागांवकर
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात येतात. त्याला सोलापूरकर दिलखुलासपणे प्रतिसाद देतात, आणि कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात. सोलापूरकर रसिक श्रोत्यांच्या प्रेमामुळे साहित्य परिषदेने दखल घेऊन दक्षिण सोलापूर शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून पुरस्कार जाहिर केला. यामुळे आणखी नवनवीन कार्यक्रम घेण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी व्यक्त केली.
