"शुभ शकुनाचे पक्षी" आसमंतात सोडून आज स्वत: ही आसमंतात " गरुड भरारी " घेतलेले व टेबलला टेबल जोडून अनेक वर्षे मेडिकल कॉलेज मध्ये एकत्र काम केलेले एक काळ त्यांच्या स्कुटरवर बसुन गल्ली-बोळ, वाड्या- वस्त्या गावोगावी फिरुन कवी संमेलन केलेले ज्येष्ठ सहकारी मित्र कवी माधव पवार यांच्या आठवणी आता कायम माझी पुंजी बनून रहातील.
आज मती आणि लेखणी साथ देत नाही. माझ्यासह दोघी थरथर कापताहेत. मग एक जुना वाढदिवसाला लिहिलेला लेखच श्रद्धांजलीत परिवर्तीत करताना डोळ्यात फक्त अश्रू दाटलेले आहेत.
आजच्या लेखाचा हिरो एक "मृत्युंजयी कवी" आहे. अर्थातच शब्दांचे 'शुभ शकुनाचे पक्षी' आसमंतात मुक्तपणे विहरायला सोडून एक निर्मळ, नितळ, जिव्हाळा युक्त बंधुभाव प्रसवण्यासाठी व( स्व:त अनेक वर्षांपासूनच्या आजाराशी मैत्री करुन वेदनांवर मात करीत हजारो डायलिसिसच्या वेदना सहन करुनही हसत रहाणं सोपं नाही) वेदनामुक्त समाजाचे स्वप्न पहाणारा मृत्युंजयकार कवी.
"दोन दिसास्तव येतो कोणी, खेळ खेळतो गातो गाणी
खेळ संपता परतीसाठी
पाऊल त्याचे वळते
जगाशी काय कुणाचे नाते"
अशा अध्यात्म अधोरेखित करीत जीवनाचं क्षणभंगुरत्व काव्यातून मांडलेल्या व
"कोणी म्हणू नका दुनियेत देव नाही
देवासमान दुसरी आयुष्यात ठेव नाही"
म्हणत येई मृत्यो ये रे सख्या तुज मी उराउरी भेटतो" म्हणत देवचरणाशी लिन झालेल्या ज्येष्ठ कवीवर्य रा. ना. पवार (दादांची थोडी का होईना सेवा वाडियात अॅडमिट असताना माझ्या पोरसवदा वयात झाली, हे माझे भाग्य.)यांच्या चरण कमलावर नतमस्तक होत निघालेल्या या कवीची कविता लिहीताना त्यात जगताना तदाकार ब्रम्हवृत्ती आत्मसात झालेली आहे. हे मला जाणवते आहे.
ही माझ्या जवळचा म्हणून मी स्तुती करतोय, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण अगदी परवा बऱ्याच काळानंतर एका साहित्यिक संस्थेच्या मार्फत घरगुती सत्कार कार्यक्रम निमित्ताने इतरांसोबत माझी भेट झाली. तास दोन तास बोलत बसलो होतो, नव्हे ऐकत होतो.आणि ऐकतच बसावे वाटत राहीले.
आपलं सर्वाच एक काय असतं, आपण फार लांबचा कोणी असला की, तो आपल्याला फार मोठा वाटतो हा कवी आपल्या घरातला कुटुंबातला वडिलधारी आगळा-वेगळा अलौकिक मला भासू लागला. आणि अभिमानही वाटू लागला की, अशा आभाळ उंचीच्या व्यक्तीमत्वाबरोबर मी अनेक वर्षे एका संस्थेत एकत्र टेबलला टेबल जोडून काम केले.
उंच... गोरापान... गाल भरुन काळीभोर दाढी त्याकाळी ब्रॅंडेड कपडे ही संकल्पनाही कुणाला माहीतही नव्हती. अशा काळात भारी कपड्यात, इनशर्ट, बेल्ट, बुटात हा कवी रोज वावरायचा सर्वांची दृष्ट लागावी असे (एखादा हिरोच जणू) लक्ष वेधून घ्यायचा.
त्यांच्या चार्ली चॅप्लिनचे मोठे चित्र लावलेल्या स्कुटरवर आम्ही फिरायचो. शाळा-कॉलेजमध्ये त्यांच्या नकला, विविध फिल्मी कलावंताचे आवाज (येरे येरे पावसा) कार्यक्रमात तुडुंब गर्दी हास्यात कल्लोळ करायची. कधी-कधी या कलावंताचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर असायची.
आमच्या वैद्यकीय महाविदयालयात सिव्हिल आवारात कुठे गर्दीत अगदी अधिकारी, डिन असले तरी हास्य फवारे उडत असलेचे चित्र दिसले की, लोक ओळखायचे तिथे माधव पवारच आहेत. जागोजागी रडवणाऱ्यांच्या दिवसात हा दिलखुलासपणे हसवणारा कवी सोलापूरचे सांस्कृतिक वैभवच आहे.
आमची मने, विचार त्याच काळात जुळले. सुख-दु:ख भोगले माझी मोठ्या भावाची उणीव भरुन निघत गेली. अर्थातच त्या नात्यापोटी येणारा राग रुसवा माझा होत राहीला. परवा काही दिवसांपूर्वी मात्र हे दिव्य रुप पाहून भारुन राहीलो. व भावनेच्या भरात हे मोडकं तोडकं लिहिणं होतयं.
(1996 साली मी लिहिलेला लेख दैनिक संचार मध्ये भावनाप्रधान 'हरहुन्नरी कवी माधव पवार' हे शिर्षक असलेला मोठा लेख संपादकीय पानावर फोटोसह छापून आला होता. शिवाय तीन वर्षांपूर्वी दै. एकमत मध्ये " मृत्युला वाकुल्या दाखवत, जीवन शिकवणारा कवी'' हे शिर्षक असलेला लेखही गाजला होता.
मी मुलाखती घेत होतो, त्या चॅनेलला दिर्घ अशी मी घेतलेली मुलाखत रसिकांच्या पसंतीस उतरली होती) शेकडो लेख कविता अगदी सहज लिहिणारा मी सगळे शब्द आज लपून बसलेत असं वाटतय.
अंतरातील माणसांवर लिहीताना काय त्रास होतो, हे आता कळतय.आमचे प्रशासकिय अधिकारी अक्कलकोटकर सर म्हणायचे, 'तुमच्यापैकी एकजण चहाला म्हणून गेला की दुसराही लगेचच त्याच्या मागे पळतो हे काय चाललंय ?टेबलवर नसला की दोघेही नसता. असे म्हणून सदा रागावणारे अक्कलकोटकर नंतर काही दिवसांनी म्हणू लागले, 'तुम्हा दोघाची जोडी खरोखरच आनंददायी आहे हं.' तुमच्यामुळे अनेक कार्यक्रमांना उंची येते. ऑफिसमधील वातावरणही प्रसन्न हलके-फुलके रहाते. तुमच्यासारख्या कलावंताची कदर करायलाच हवी. माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सुट !
हीच प्रथा, स्व. ठेकेदार सर,कांबळे सरांसह इतरांनी कमी जास्त प्रमाणात नेऊन मदत केली. आणि मग काय ड्युटीवर असतानाच आम्ही माधव पवार यांची स्कुटर की, ज्यावर चार्ली चॅप्लिनचे मोठे स्टिकर सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे त्यावर बसुन घरगुती मैफिली, छोटे मोठे तासाभराचे कविसंमेलन, नकलांचे कार्यक्रम करुन यायचो.
शाळा व इतर ठिकाणी त्यावेळी एकपात्री नकला कार्यक्रम एकटेच करायचे. 'येरे येरे पावसा' गीत वेगवेगळ्या कलावंतांचे आवाजात सादर करुन रसिकांना हास्यकल्लोळात हरवून टाकायचे. सुरुवातीला मी फक्त त्यांचा परिचय करुन द्यायचो. कवी पवार यांच्याकडे मोठमोठे लोक भेटायला यायचे. त्यांना आम्ही चहाला मागच्या कँटीनला घेऊन जायचो (आधी ही कॅंटीन तळघरात होती) तेथेच महफिल जमायची. जमायची कसली माधव पवार हसवून हसवून पुरेवाट करायचे.
मी जागेवर नाही, म्हणून कोणीतरी तक्रार करायचे. मग ए .ओ. मला बोलावून रागवायचे. ते माधव पवारला मी सांगायचो, मी आता तुमच्याबरोबर येत नाही. म्हणताच ते मला घेऊन साहेबांकडे यायचे, माझ्याविषयी सांगायचे. साहेब संपूर्ण ऑफिसमध्ये आम्ही दोघेच तर कवी कलावंत आहोत. आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्यायला हवे. वगैरे समजावून सांगायचे. आणि म्हणायचे औटी! तुम्हाला कोण काय म्हणले की, मला सांगा. तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन आहे, आणखी काही कुणाला माहिती नसते. नंतर माझी बदली ग्रंथालय वा नंतर ओपीडीत इतर कुठल्याही विभागात झाली, तरी तेथे येणे व त्यांच्या टेबलवर जाणे असायचे.
मी सिव्हिल क्वार्टरमध्येच मी रहायला असलेने सतत घरी गप्पा व्हायच्या. माझी आई वारल्यावर घरी येऊन दिलेला धीरच त्यांनी आईची कविता ऐकवून केला. अशा अनेक आठवणी आहेत.
गेल्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाल्याचे निमित्ताने "समरसता" तर्फे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी दोन तास बोलत बसलो होतो. त्यावेळी त्यांच्या आवडीच्या कविता ऐकवल्या.
परवा शिवस्मारक येथे समरसता साहित्य संघाचे मोठे राज्यस्तरीय कविसंमेलन माधव पवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. सुत्रसंचालन माझ्याकडं होते. त्यावेळी माधव पवार यांनी माझ्या कवितेचे सुत्रसंचालनाचे नेहमीप्रमाणे भरभरून कौतुक करुन सत्कार केला.
त्यावेळी मी म्हणालो, मीही सध्या आजारी असतो वगैरे म्हणताच पाठीवर हात ठेवला नि म्हणाले, मी आहे ना तुझ्याबरोबर. आणि हे तुला सांगण्याचा अधिकार मला आहे. कारण तुला सगळं पहिल्यापासून माझं माहीत आहे, मी किती आजारानां तोंड देतोय ते. आजार येतात जातात, त्यांचा जास्त लाड करायचा नाही. माझा आदर्श ठेव याबाबतीत. डॉक्टरला माझं नाव सांग. औषधं मात्र वेळेवर घे, अन् महत्त्वाचे म्हणजे आता तरी तुझी ती समाजसेवा थांबव बाबा ! तुला राग आला हरकत नाही, पण हे तुला कोणीतरी सांगणे गरजेचे आहे. दग-दग या वयात होत नसते.
आता लोकांतातून एकांतात माणूस पाहिजे. ऑफिसमधले बरेचजण मला सांगतात की, अजुनही तु सतत सिव्हिलमध्येच ओपीडी वार्डात असतोस. आता हे पब्लिक कॉन्टॅक्ट कमी कर. सगळं आयुष्य सायकलवर फिरुन खूप प्रचंड केलंस.
सतत रस्त्यावर चौकात, गावभर लोकांसाठी काम करण्यात गेलं. तुझ्याभोवती सारखी गर्दीच असते. आता कोण येतंय का बघ तुझ्या वेळेला? आता बस कर, नाही तर मी वहिनीला सांगू का ? याला घराबाहेर सोडू नका म्हणून. मुलगी म्हणतेय किती वर्षांपासून माझ्याकडे कधीच येत नाहीत पप्पा. आता तु तिच्याकडे आरामाला जावं असं मला वाटतं. बघ बाबा तु विचार कर. तुला मी काय सांगणार?
ओपीडीत ड्युटीत असताना तुच तर शेकडो पेशंटना व त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगणारा. मला देखील तुच सांगतोस की, असे करु नका ही काळजी घ्या. वगैरे. तरीपण एक सांगतो हे शरीराचे भोग असतात हे स्व:त भोगुनच जातात यातुन कोण सुटत नाही. वगैरे ..(सविस्तर बोलत आम्ही शिवस्मारकच्या बाहेर पडलो. तेंव्हाच खांद्यावरचा हात त्यांनी थोपटत काढला, नि माझ्याकडे मायेने पहात धीर देतच निरोप घेतला.
यावेळी माझ्या डोळ्यातले पाणी पाहून परत टू व्हिलर परत फिरवायला सा़ंगून खाली उतरुन पोटाशी धरले.) आता असं मायेनं सागणारं कोण आहे आता मला? आज हे लिहिताना मित्रहो, छाती फाटून गेली आहे. आभाळ फाटलं आहे. हा कवी "जीवनासह मृत्युही त्यांना कळले हो" च्या प्रभावळीत आज सहज जाऊन बसला आहे. " मज पामरासी काय मोठेपण "...
या संत वचनाची व्याख्या अधोरेखित करणारं अशा वास्तववादी हृदयद्रावक कवितांनी अंतर्मुख करणाऱ्या ओढवून घेतलेल्या दारिद्रयातही गरीबांवर व गरीबीवर प्रेम केलेल्या. व "जे काही भोगले त्यालाच सुख मानावे लागले" अशा अर्थाच्या चटका लावणाऱ्या कवितांचा जनक याचं स्थानही वेगळंच...!
या कवीचा परखडपणा, प्रगल्भपणा जसा कवितेतून जाणवतो, तसा आचरणातही. काट्याची फुलं करुन जगावर ऊधळण्याची किमया करावी तर या बहाद्दर कवीनेच. बाहेरुन सख्त खडबडीत जसे नारळ असते तसे हा कवी अंतरबाह्य मधुर, कोवळा, हळवा, कुटुंबवत्सल अप्रदर्शनीय होता.
आपल्या जीवन संगीनीला प्रेरणा स्रोत मानून यशस्वी संसाराचं सार श्रेय सौ. चारुलता वहिनींना मोठ्या मनानं देणारा हा कवी. एका मुठीत न मावणारं अष्टपैलु रसायन. यांची मुलंही, स्नुषा गुणवान, सुसंस्कारी माणुसकी जपण्यासाठी अग्रेसर असतात. मोठमोठ्या नामांकित धनीक व्यक्तीबरोबर उठबस असणारा एम. आर., छोटु या लाडिक टोपण नावांने लोकप्रिय असलेला हा कवी अनेक मानाच्या पुरस्कारांनी विभुषीत झाला आहे.
एकदा तर चक्क थेट कुसुमाग्रजांच पत्र आलेला हा अवलिया. नवोदितांचा आदर्श अनेक कवी संमेलनांचा सुत्रसंचालक असलेला (पिताश्री रा. ना. दादांकडेही आभाळ उंचीची माणसं लिन होऊन यायची) हा कवी म्हणतो, कसा मला वडिलोपार्जित लाख रुपयांची इस्टेट मिळाली नाही, पण लाख-मोलांची माणसं मला मिळाली.
जीवनमृत्यूचा खेळ जिथे असतो, अशा सिव्हिलमधील आय. सी. यु. मध्ये वीस-बावीस पूर्वी स्वत: अॅडमिट असतानाही डॉक्टर, सिस्टरांसह वॉर्डातील रुग्णांनाही हसवणारा हा कवी एक न उलगडणारा खरा. त्याच्या हरेक अशा अनेक अदभुत प्रसंगाचा मी एकेकाळचा साक्षीदार जिव:श्च जोडीदार म्हणून आयुष्याच्या या स्टेजवर मला अभिमान वाटतो.
एखादी कविता झाली की, तो कागद समोर धरुन त्यांनी ऐकवावी आणि मी ही मोठा असल्याचा अविर्भाव आणत ऐकावी असे ते भाबडे दिवस, असा हा भाबडा इतरांना मोठं मानणारा कवी. मंतरलेले दिवसच ते खरे. "या कवीच्या सेवानिवृत्ती दिनाचे कार्यक्रमाचे (सेंड ऑफ)संयोजन सुत्रसंचालन मी केले होते.
भोंगा या कवितेत गिरणी कामगारांचं भयंकर वास्तव मांडणारी स्व. दादांची कविता व ...."लेकीचीही लावणी असते, हे साहित्य क्षेत्राला पहिल्यांदा सांगितलेल्या व ज्या " कोंबडा " या कवितेला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते. "अशा स्व. कविवर्य रा. नां. दादांनी कवितेची सोपी व्याख्या केली होती. कविता कशी असावी, तित शारदेला तिची प्रतिमा दिसावी, जी वाचता सहज कळावी .... "
त्यांच्याच सुपुत्राने " विधात्याच्या या अवकाशात, शुभशकुनाचे पक्षी सोडून, " देवा बोला हो माझेशी" म्हणत देवादारी "गरुड भरारी" मारलेल्या या कवीला विधात्याने तेवढ्याच मायेने जवळ घेऊन मोक्षप्राप्ती करुन द्यावी, हीच प्रार्थना !
सोलापुरी मातीत पुन्हा ऐसा कवी होणे नाही. 
कवितेतील बादशहाला माझ्या मोठ्या भावाला डबडबत्या डोळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली
(कवी-देवेंद्र औटी)
