सोलापूर/प्रतिनिधी : पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पत्रकार कृती समितीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. पत्रकारांच्या चार चाकी वाहनांना टोलमधून पूर्ण सूट मिळावी, या प्रमुख मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकार कडे वारंवार निवेदने देऊनही मागण्यांकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी वेळी केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या कामकाजासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, टोलमधील सवलत ही अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाला पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे आणि पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला.
तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्यासह समितीचे पदाधिकारी -कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या हितासाठी आणि सन्मानासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केला.
“पत्रकारांच्या हक्कांसाठीच्या या लढ्यात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत,” अशी भावना कृति समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी व्यक्त केली.
