सोलापूर : माजी खासदार विणकररत्न गंगाधर सिद्रामप्पा कुचन यांचं वार्धक्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांना येथील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांची मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते मृत्यूसमयी 91 वर्षीय होते.
गंगाधर कुचन यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पद्मा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. सायंकाळी 05 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयास देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
सोलापूरसह महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गंगाधरपंत कुचन यांनी जवळपास राज्यातील 23 सहकारी सूतगिरण्या उभारणीमध्ये सिंहाचे योगदान दिलं आहे. 1980 आणि 1985 या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचे ते तत्कालीन खंदे समर्थक अशीही त्यांची जनमाणसांत ख्याती होती.
1990 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. यानंतर काही काळ ते काँग्रेसमध्ये होते. यानंतर मात्र 1991 च्या प्रारंभी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भाजप उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या विजयासाठी कुचन यांनी मोठ्या योगदान दिलं.
यानंतर 1995 च्या सुमारास गंगाधर कुचन यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध पक्षातील राजकारणी कुचन यांचं सहकार आणि अन्य क्षेत्रात मार्गदर्शन घेत.
सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय याचबरोबर सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय यांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते राज्य सहकारी बँकेवर औद्योगिक बँकेच्या माध्यमातून अनेक वर्ष संचालक होते.
सोलापुरातील पूर्व भागातील नागरी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या उभारणीमध्ये गंगाधर कुचन यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद रस्त्यावरील पहिलं विड घरकुल उभारणीचं काम याची मुहूर्तमेढ गंगाधर कुचन यांनी रोवली होती.
पूर्व भागातील अनेक शिक्षण संस्था विशेषतः पद्मशाली शिक्षण संस्था उभारणीमध्ये गंगाधर कुचन यांचा सक्रिय सहभाग त्या-त्या वेळी होता. गेल्या पंधरा वर्षापासून ते सर्व प्रकारच्या सक्रिय राजकारणापासून लांब होते, मात्र घरामध्ये नित्य नियमित वृत्तपत्र वाचन विविध क्षेत्रातील माहिती घेणे सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे हे काम सुरू होतं.
गेल्या काही दिवसापासून गंगाधरपंत कुचन यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना अश्विनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. गंगाधर कुचन यांच्या पश्चात विवाहित तीन मुलं, सुना, विवाहित दोन मुली, जावई, नातवंडं असा परिवार आहे.
शब्दभार : अविनाश कुलकर्णी, सोलापूर.
