ती पत्नी, त्यामुळे ‘ते’ कृत्य गुन्हा नाही, असा दावा करणाऱ्या नवरोबाला न्यायालयाचा दणका !

shivrajya patra

सोलापूर : फिर्यादीबरोबर आपले कोर्ट मॅरेज झालं आहे. त्यामुळं ‘ते’ कृत्य गुन्हा नाही, बलात्काराचा गुन्हा निष्पन्न होत नाही, असा दावा करणाऱ्या नवऱ्याचा जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पिडीत तरुणीनं मार्च महिन्यात पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनंतर, दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यास गजाआड केलं होतं.

माढा तालुक्यातील ‘त्या’ तरुणीने मार्च 2026 मध्ये कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत असा आरोप केला होता की, 2016 मध्ये तिच्या घराजवळ राहत असलेल्या परधर्मीय तरुणाबरोबर तिची ओळख झाली. त्यानंतर तो तिच्या मागे लागला. 10 वी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने 2018 मध्ये सोलापुरातील एका नामांकीत महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

तेथे देखील तो तिला भेटायला येत होता. त्यानं 2018 मध्ये तिला सोलापूर शहरातील एका लॉजवर नेऊन तिचे इच्छेविरुध्द शरीर संबंध केला. 2025 मध्ये ती शिक्षणासाठी पुणे येथे राहत असताना तो तेथे आला आणि तिला तुझे फोटो व्हायरल करेन, असा दम देऊन तिला मुंबई, गुजरात, राजस्थान येथे पळवून नेले.  

पुण्यात परतल्यानंतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ दस्त तयार केला. त्यानंतर काही दिवसानंतर तिला दमदाटी देऊन अंतरधर्मीय असल्याने कोर्ट मॅरेजसुध्दा केले. त्रास असह्य झाल्यानंतर तिने तिच्या आईवडिलांना सर्व हकीकत सांगून आरोपीविरुध्द कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांकडं आरोपीविरुध्द पोक्सो अंतर्गत बलात्कार आणि बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल झाला.  पोलिसांनी आरोपीस अटक केली. 

आरोपीने बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. फिर्यादीबरोबर आपले कायदेशीर लग्न झाले आहे. त्यामुळे कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही, असा दावा करत जामीन अर्ज दाखल केला.  

त्या जामीन अर्जास मूळ फिर्यादी पिडीत तरुणीतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करुन प्रखर विरोध करण्यात आला. आरोपीविरुध्द सकृत दर्शनी पुरावा आहे, आरोपीने फिर्यादीवर 2016 साली लॉजमध्ये शरीरसंबंध केले त्यावेळी ती अज्ञान होती, असं मत व्यक्त करुन न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 

या प्रकरणी सरकारतर्फे ॲड. डी. डी. देशमुख, मुळ फिर्यादी पिडीत तरुणीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झाल्टे यांनी काम पाहिले.

To Top