सोलापूर : सुसंस्कृत समाज घडविण्यात वाचनालयांचे नेहमीच योगदान असते, कारण वाचन संस्कृति आत्मसात केल्याशिवाय चांगल्या व सेवाभावी समाजाची आपण कल्पनाच करू शकत नाही, असे मत ऊर्दू-मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नत्लामंदू यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा सार्वजनिक वाचनालय संघ आयोजित " ग्रंथालय व समाज " या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी सेवानिवृत्त उप-प्राचार्या सौ. सुरैय्या परवीन जहागीरदार तर ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नत्लामंदू कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी होते.
जीम (व्यायामशाळा) प्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये मनपाच्या वतीने एक एक ग्रंथालय सुरू करावे, अशी गरज देखील ज्येष्ठ साहित्यिक नत्लामंदू यांनी यावेळी अधोरेखित केली. 
ग्रंथपाल गणेश फंड यांनी पाहुण्यांचे पुस्तके देऊन स्वागत केले तर ग्रंथपाल जाफर बांगी यांनी पाहुण्यांचे परिचय देत ग्रंथपाल प्रशिक्षणासंदर्भात माहिती दिली.
ग्रंथपाल प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना निवृत उप प्राचार्या डॉ. सुरय्या जिलानी जहागीरदार म्हणाल्या - ग्रंथालय व साहित्यिकांचे नाते जुने आहे. एक चांगला व अभ्यासपूर्ण साहित्यिक घडविण्यात प्राचीन काळापासून आजपर्यंत ग्रंथालयाचे मोलाचे योगदान सिद्ध झाले आहे. 
आपण अनेकदा पाहिले असेल कि, एक चांगला व अभ्यासपूर्ण लेखक आपल्या पुस्तकात शेवटच्या पानावर त्याची नोंदी प्रसिद्ध करत असतो. जेणेकरून पुस्तक परिपूर्ण होते, परंतु हे सर्व श्रेय ग्रंथालयानांच जाते, असे मत व्यक्त करून ग्रंथालय व त्यातील पुस्तकांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जाफर बांगी यांनी केले तर गणेश फंड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका माडीगर, गितांजली गंभीरे यांनी खूप परिश्रम घेतले.
