उर्दू साहित्यविश्वातील तेजस्वी तारा हरपला; फारूक सय्यद यांच्या स्मृतींना बजमे गालिबतर्फे भावपूर्ण अभिवादन
सोलापूर : ‘गुलबुटे’ उर्दू मासिकाचे संस्थापक-संपादक, ‘उर्दू मेला’ साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ उर्दू साहित्यिक आणि सोलापूरचे सुपुत्र फारूक सय्यद यांचं मुंबई येथे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. रविवारी, 24 मे रोजी सोलापूरातील बजमे गालिब तर्फे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
उर्दू साहित्यविश्वात आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, ‘गुलबुटे’ उर्दू मासिकाचे संस्थापक-संपादक, ‘उर्दू मेला’ साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ उर्दू साहित्यिक आणि सोलापूरचे सुपुत्र फारूक सय्यद यांच्या निधनावर अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या.
साहित्य, पत्रकारिता आणि उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांनी या सभेला उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ उर्दू साहित्यिक बशीर परवाज या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होते.
मंचावर शायर डॉ. आसिफ इक्बाल , एम. ए. पानगल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक हारून रशीद बागबान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते.
सभेत बोलताना अनेक वक्त्यांनी फारूक सय्यद यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, शालीनता, शिक्षकांविषयी असलेला आदर, उर्दू भाषेवरील नितांत प्रेम आणि साहित्यसेवेतील त्यांचे योगदान अधोरेखित केले. उर्दू भाषेला जागतिक स्तरावर गौरव मिळवून देण्यात फारूक सय्यद यांचे मोठे योगदान आहे.
उर्दू साहित्याच्या माध्यमातून त्यांनी इराण, कतार , लिबिया, नेपाल, दुबई, पाकिस्तान व तसेच सौदी अरेबिया सारख्या देशांना अनेक वेळेस भेट दिली. सोलापूरचे नाव देशभरातच नव्हे तर साहित्यविश्वातही उज्ज्वल केले, अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या. ‘उर्दू मेला’ आणि ‘गुलबुटे’ या त्यांच्या साहित्यिक वारशातून त्यांची स्मृती सदैव जागी राहील, असेही अनेकांनी नमूद केले.
फारूक सय्यद यांचे भाचे आणि शायर डॉ. आसिफ इक्बाल यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. पुढे ते म्हणाले की, डॉ. गौस अहमद शेख यांच्या प्रयत्नाने दिवंगत फारुक सय्यद यांच्या साहित्यीक कार्यावर सोलापूर विद्यापीठात संशोधन व पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. उमरा यात्रेपासून ते आजारपणातील कठीण दिवसांपर्यंतच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. उर्दू साहित्यावरील त्यांचे प्रेम, माणसांशी असलेला जिव्हाळा आणि संघर्षमय आयुष्य उलगडताना डॉ. आसिफ इक्बाल भावूक झाले.
शहाबुद्दीन चितापुरे यांनी फारूक सय्यद यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक प्रसंग सांगितले. ज्येष्ठ कवी मीर अफजल मीर आणि हबीब नागपूरवाले यांनी मरहूम फारूक सय्यद यांच्यावर स्वरचित कविता सादर करून वातावरण अधिक भावुक केले.
फारूक सय्यद यांचे वर्गमित्र आणि नाट्य दिग्दर्शक सय्यद इक्बाल यांनी “लहानपणीचा मित्र हरपल्याचे दुःख शब्दांत मांडता येणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय समारोप करताना बशीर परवाज यांनी फारूक सय्यद यांचे उर्दू भाषेवरील प्रेम अधोरेखित केले. शायरीच्या काही ओळींतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांना अंतर्मुख केले.
याप्रसंगी महेबुब कुमठे, अब्दुल रशीद जनवाडकर, सिराज मोमीन, महेमूद नवाज आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी हारून रशीद बागबान यांनी प्रास्ताविकातून फारूक सय्यद यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेत शोकसभेची भूमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाला इतिहासकार सर्फराज अहमद, शफी कॅप्टन सर, मुबिन बिजापूरे, राजा राजेशचंद्र, साहिर नदाफ, इक्बाल बागबान, डोणगावकर सर यांच्यासह फारूक सय्यद यांचा मित्रपरिवार आणि उर्दूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फारूक सय्यद यांच्या रूपाने उर्दू साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांच्या शब्दांचा सुगंध आणि साहित्यसेवेचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशी भावना शोकसभेतून व्यक्त झाली.
..... चौकट ......
''आम्ही सोलापूरकरांनी त्यांना काय दिले?” : वजाहत अब्दुल सत्तार
मात्र, उर्दू नाट्य कलाकार वजाहत अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनोगतात एक वेगळीच खंत व्यक्त केली. “फारूक सय्यद यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. पण ते शब्दांत व्यक्त करणार नाही; त्यांच्या आठवणी मी हृदयात जपून ठेवणार आहे. माणूस गेल्यानंतर त्याचे गोडवे गायले जातात, पण जिवंतपणी आम्ही सोलापूरकरांनी त्यांना काय दिले?” असा मार्मिक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याने सभागृह काही क्षण स्तब्ध झाले आणि अनेकांच्या मनाला चटका लावून गेले.
