सोलापूर : सर्व समाजात विधवा, विधूर आणि घटस्फोटीत असे एकाकी जीवन जगणारे अनेक जण आहेत, त्यांना जिवन जगताना मायेचा आधार मिळावा, दुसरी संधी म्हणून जीवनात योग्य जोडीदार मिळावा, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने शिवस्मारक सभागृह येथे सर्व धर्मीय, सर्व जातीय, घटस्फोटीत विधवा वधू-वर पुनर्विवाह परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
शिवस्मारक सभागृहात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पहिल्यांदाच सोलापूर मध्ये विधवा, विदुर, घटस्फोटीत पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रकांत पवार, वसुंधरा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या काळात अशा प्रकारचे वधू-वर परिचय मेळावे, विवाह सोहळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आयोजित करावे, असं आवाहनही चंद्रकांत पवार यांनी यावेळी केले.
संभाजी ब्रिगेडच्या परिवर्तनवादी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिचय मेळाव्यास, 57 विधवा-विधूर यांनी उपस्थित राहून नोंदणी केली.
