डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पिडित आणि अस्पृश्य समाजाला मानवी हक्क व समता मिळवून देण्यासाठी सुरु केलेली सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळ म्हणजे 'आंबेडकरी चळवळ 'होय. ही चळवळ शिक्षण संघर्ष आणि एकता या तत्वावर आधारित अमून जातीयता आणि विषमतेविरुद्ध लढा देणारी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या नेतृत्वाखाली 1920 च्या दशकात विषमतेविरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठी सूरु झालेली एक क्रांतिकारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. म्हणूनच म्हणावेसे वाटते, मानवाचा उद्धार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... न्यायाचा विचार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... अन्यायाचा प्रतिकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... क्रांतीचे हत्यार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... !
बाबासाहेबांनी 1920 मध्ये अखिल भारतीय दलित वर्गाची स्थापना करून दलितांच्या समस्यांवर आवाज उठविलाः 'बहिष्कृत हितकारिणी सभेची' स्थापना करून दलित व मागास लोकांमध्ये शिक्षणाचे महत्व रूजवले. 1927 साली महाडचा सत्याग्रह करून सार्वजनिक पाणवठे सर्व जाती-धर्मासाठी खुले करून दिले. 1930 साली नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह करून सामाजिक समता व मानवी हक्क मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी हक्कावर आधारित या चळवळीने दलितांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केले आणि समाजात ममानतेचा विचार रुजविला.
डॉ. आंबेरकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन मानले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा विचार त्यांनी चळवळीच्या माध्यमातून मांडला. त्यांनी सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालये स्थापन केली. अस्पृश्य समाजातील मुलां-मुलींसाठी वसतिगृहे, शाळा, वाचनालये, रात्रशाळा सुरु करून दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
...
दलितांना राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमधून दलितांच्या हक्काचे समर्थन केले. दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 1936 मध्ये 'स्वतंत्र मजूर पक्ष आणि 1942 मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 1932 सालचा पुणे करार' त्यांच्या चळवळीतील एक महत्वाचा टप्पा होता. या करारामुळे दलितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले. दलितांच्या राजकीय हक्कासाठी मोठा संघर्ष या चळवळीने केला.
डॉ. आंबेडकरांनी लोकशाही शासन पध्दतीचा पुरस्कार केला. कारण ती स्वातंत्र्याचे रक्षण करते, जातीभेद हा लोकशाहीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, हे ओळखून संविधानातील कलम 17 च्या माध्यमातून जातीयता व भेदभाव नष्ट केला. 'एक व्यक्ती, एक मत' हे लोकशाहीचे तत्व त्यांनी संविधानात आणले. त्यांनी सांविधानिक मार्गाने सामाजिक व राजकीय क्रांती घडवली.
क्रांतीच्या परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही चळवळ दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. जात, धर्म, समुदाय यांच्या पलीकडे जाऊन पाहण्याची जी दृष्टी संविधानाच्या माध्यमातून महामानवाने आपल्याला दिली, ती आपण मनापासून अंगीकारूया.
न्याय, समता, बंधुता या मूल्यावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील 'भारत' निर्माण करूया. महामानवाने केलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन आपण त्यांची चळवळ पुढे नेऊया.
प्रज्ञासूर्याने दिलेली शिकवण 'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा' आचरणात आणूया.
हजारो वर्षे अन्याय, अत्याचार, दारिद्रय, अज्ञानाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या माणसांना त्यांनी सन्मानाने व आत्मविश्वासाने जगायला शिकवले, म्हणूनच म्हणावेसे वाटते, "उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे !"
पंचशीला बाबुराव कांबळे,
सहशिक्षिका- मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. 9 सोलापूर.