डॉ. बाबासाहेबांना मानणारे अधिक अन् जाणणारे कमी झाल्याने चळवळ थंडावली : प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे

shivrajya patra
सोलापूर : कर्मचारी सेवक वर्ग, राजकारण, समाजकारण आणि साहित्य अशा सर्व विभागात उभी राहिलेली दलित चळवळ डॉ. बाबासाहेब आम्बेडकरी विचारांवर चालणारी विवेकवादी व लढाऊ चळवळ होती. दलित पँथर ही एकाच वेळी राजकीय नेते आणि साहित्यिक घडविणारी चळवळ होती. मात्र अलिकडच्या काळात विद्यापीठ नामांतर आणि खैरलांजी प्रकरणानंतर आम्बेडकरी चळवळ ठंडावल्याचे दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे  चळवळीत डॉ. बाबासाहेबांना मानणारे अधिक झालेत आणि जाणणारे कमी झालेत, अशी खंत  लातूर येथील प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी केले. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समिती सोलापूरच्या वतीने वसुंधरा महाविद्यालायात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेतील "आंबेडकरी चळवळ: ऐतिहासिक वाटचाल, सद्यस्थिती, आव्हाने व पर्याय " या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख होते. तर समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, मनीष सुरवसे, प्रा. एम आर कांबळे हे विचारमंचावर उपस्थित होते. 
प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व स्वामी विवेकानंद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आले. प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी प्रास्ताविक केले. मनीष सुरवसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

यावेळी बोलताना  प्रा. डॉ. कोल्हापुरे म्हणाले की, ज. वि. पवार यांनी डॉ. आम्बेडकरोत्तर चळवळ यावर पाच खंड लिहिले. यावर प्रतिक्रिया देताना नामदेव ढसाळ यांनी आंबेडकरोत्तर वगैरे असे काही नसते. फक्त आंबेडकरच असते, असं म्हटलं होतं. 

आंबेडकरी विचार हा सर्वकालीन विचार आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षापासून सुरु झाला आणि आजही ती सुरु आहे. रिपाइं सुरु झाली आणि त्यातील भंडारे नावाचे लढवय्ये कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये गेले. चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्याला सोडून गेलेल्याचा राग धरण्याऐवजी भंडारे यांनी बाजी मारली, अशा शब्दात कौतुक केले. 

त्यानंतर रूपवते, बी. सी. कांबळे, दादासाहेब गायकवाड अशी फुटिरांची रांग लागली. विशेष म्हणजे त्यांचेही त्यांनी बाजी मारली असे कौतुक होत असतानाच दलितातील क्रांतिकारी कार्यकर्त्यांनी दलित पँथर नावाची संघटना जन्माला घातली. 
'दलित पँथर' चा इतका दबदबा होता की, दलित विरोधी माणूस आंबेडकर चौकातून पुढे जायला घाबरायचा. पुढे हिचा दबदबा संपला पण तीही फुटली. नंतर कांशीराम यांनी बसपा उभी केली. 1989 ला ते राजीव गांधी या पंतप्रधानाच्या विरोधात अमेठीत लढले. 

ते हरल्यावर त्यांना विचारले गेले कि हरणार हे माहित असतानाही तुम्ही का लढले. तेव्हा ते म्हणाले की, बापू के बच्चे के खिलाफ भी बाबा का बच्चा लड़ सकता है, ये मुझे कार्यकर्ताओं को दिखाना था ! हा बाणा चळवळीतून गेला आहे. 

रेल्वे, बीएसएनएल, पोस्ट , शिक्षक अशा सर्व सरकारी क्षेत्रातील  मागासवर्गीय  कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी स्वतःच्या पगारीतील पैसे खर्च करून संघटना उभ्या केल्या आणि वाढविल्या होत्या. ज्यांनी मागास वर्गाच्या प्रश्नावर आवाज उठविला. हा इतिहास आहे. 

वर्तमानात सारे शिलेदार धर्मांध शक्तीच्या बाजूने गेला आहे. कुणी थेट फडणवीस यांच्या सोबत तर कोण एकनाथ शिंदे यांच्या साथीने युतीत आहे.  लॉन्ग मार्च काढणारे कवाडेही त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून आहेत आणि कविता लिहिणारे आठवलेही. 

'थॉट्स ऑफ पाकिस्तान ' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की, धर्मान्ध शक्ती सत्तेतच येऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे, सांगतात. आज आपल्या चळवळी नेमके उलटे करीत आहेत. वामन दादा कर्डक लिहितात की, 'भीम माझ्यात होता.. माझ्यातला भीम मीच केला ऊणा.. दोष देऊ कुणा...' अशी आजची अवस्था असून धर्मांध शाक्तिना रोखणे हेच आंबेडकरी चळवळीपुढील मुख्य आव्हान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, शंकर पाटील, प्रा. अरुण सोनकांबळे, दत्ता थोरे, प्रा. सुवर्णा कांबळे, निजामोद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्ण कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर सरतेशेवटी प्रशांत गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. 
To Top