वालचंदच्या नूतन परिसरात ‘सर्वोदयी श्री महावीर विधान’ भक्तिभावात

shivrajya patra
सोलापूर : वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात ‘सर्वोदयी श्री महावीर विधान’ हा आध्यात्मिक व संस्कारमूल्यांनी समृद्ध कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात पार पडला. जैन तत्त्वज्ञानावर आधारित अशा विधानातून आत्मशुद्धी, संयम आणि अंतर्मुखता यांचा संदेश देण्यात आला.

परमपूज्य मुनीश्री १०८ धवलसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात श्रावकांनी स्वतःचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली.  “पूर्वी शिक्षणासोबत धार्मिक संस्कारांची जोड दिली जात होती; मात्र आज त्याचा अभाव जाणवतो. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ बुद्धीविकास बरोबर  जीवनमूल्यांची जडणघडण आहे,”.  धर्म समजून घेतल्याशिवाय त्याचे आचरण शक्य नाही, असे सांगताना त्यांनी आचार्य १०८ विद्यासागर महाराज यांच्या हायकू स्वरूपातील काव्यपंक्तींचा उल्लेख केला “धर्म का फल बाद में नहीं, अभी; कर्म का क्षय…,” या ओळींमधून वर्तमानातच आत्मशुद्धी साधण्याचा संदेश त्यांनी दिला.
निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज यांनी जैन दर्शनाचे वैज्ञानिक आणि अंतर्मुख करणारे स्वरूप स्पष्ट केले. “मंदिरातील मूर्ती ही केवळ दर्शनासाठी नसून आत्मचिंतनासाठी असते. त्या मूर्तीमध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहावे,” असे सांगताना त्यांनी अभिषेक, पूजन आणि दर्शन यांचा खरा उद्देश अंतःकरणाची शुद्धता साधणे हा असल्याचे सांगत  “बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणाची निर्मळता अधिक महत्त्वाची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. 

कार्यक्रमात आचार्य विद्यासागर महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण डॉ. रणजित गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. विजयकुमार देशमुख, वैभव गांधी, पृथ्वीराज गांधी, ब्रिजेश गांधी, भूषण शहा, पराग शहा, यश गांधी उपस्थित होते. आ. देशमुख यांनी मुनीश्रींचे दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण केले व उपस्थितांना संबोधित करताना “मुनी, गुरू समाजाला भक्ती व सदाचाराचा मार्ग दाखवत आहेत; त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे हीच खरी साधना आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुनीश्री वीरसागरजी महाराज यांनी आ. देशमुख यांना सोलापुरात जीवदया क्षेत्रात प्रेरणा मिळावी यासाठी गोशाळा उभारणीसारखे कार्य हाती घेण्याचे आशीर्वचन दिले.  जैन धर्मातील ‘अरिहंत, सिद्ध, साधू आणि केवली’ हे चार मंगल तत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आत्मविजय साधणारा खरा विजेता ठरतो, “स्वार्थत्याग, नम्रता आणि अंतरंगातील श्रद्धा यांद्वारेच आत्मकल्याण शक्य आहे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी विशेष संदेश दिला की, “मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरेक टाळून संयमित जीवनशैली स्वीकारावी. तंत्रज्ञानाचा उपयोग साधन म्हणून करावा; त्याचे गुलाम होऊ नये.”  भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या विधानामुळे उपस्थित श्रावकांना आध्यात्मिक उन्नतीचा आणि आत्मपरिवर्तनाचा संदेश मिळाला.
To Top