सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यव्यापीपणे साजरा केल्या जाणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” चे सोलापूर येथील कार्यक्रमाचं बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
सहाय्यक समाज कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने बुधवारी, 08 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक, जागरूकता व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचा प्रारंभ उपायुक्त आणि जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आला.
कदम यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, विशेष सहाय्य योजना, जात वैधता प्रमाणपत्र आणि ॲट्रॉसिटी बाबत यांसारख्या विषयांमध्ये गतिशीलता आणण्याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधींना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रती देखील भेट देण्यात आल्या.
सात दिवसाच्या समता सप्ताहात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे —
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा
- लोकनाट्य व लघुनाटिका स्पर्धा
- समाज कल्याण विभागाच्या योजनांच्या प्रतिनिधिक लाभवितरणाचा कार्यक्रम
- समता दूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका यांद्वारे योजनांची माहिती व प्रबोधन
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त (11 एप्रिल) पुतळ्याला अभिवादन व महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान
- भारतीय संविधानाविषयी सामान्य माहिती व जनजागृती
- ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व मेळावा (मोडनिंब, ता. माढा)
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान
- दिनांक 14 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व डॉ. आंबेडकर यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याविषयी माहितीपर व्याख्यान (सोलापूर जिल्हा परिषद)
सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सात दिवसांच्या कार्यक्रमाचे तपशील सादर केले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, तालुका समन्वयक संदीप मोरे, समतादूत राजश्री कांबळे, नालंदा चंदनशिवे, अश्विनी मोरे, ज्योती ओव्हाळ, रोहिणी लवटे, कार्यालय निरीक्षक विठ्ठल दसाडे, संजय साळुंखे, राहुल वाईकर तसेच इतर कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गणेश पवार यांनी केले तर उमेश पुजारी यांनी
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
***