डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
सोलापूर : येथील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, सोलापूर यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत समाज कल्याण विभाग सभापती सौ. संस्कृती सातपुते यांच्या संकल्पनेतून सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी SVCS बीएड कॉलेज, उत्तर सोलापूर येथे भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
उत्तर सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग व गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. यावेळी सभापती तेजस्विनी बोराडे, अमोल बोराडे, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार, विस्ताराधिकारी सोमनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी SVCS हायस्कूल बृह्नमठ होटगी या संस्थेचे सचिव, मुख्य कार्यकारी एस. स्वामी, प्राचार्य, शिक्षक वृंद व परिचर वर्ग या सर्वांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशासाठी बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, डोणगांव केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव कोळी, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, देगांव केंद्राचे केंद्रप्रमुख लतिफ तांबोळी, शेळगी केंद्र प्रमुख चंद्रकांत वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
परीक्षक म्हणून निवृत्ती दळवी व चंदू शिंदे यांनी उत्कृष्ट मूल्यमापन केले. विशेष शिक्षक बी. एम सोनकडे, बालाजी थिटे, लक्ष्मण काशीद यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विषय विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक ठरले- डॉ. आंबेडकर यांचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य उदा. महिलांना दिलेला मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क,
चवदार तळे महाड शताब्दी वर्ष विशेष, मानवी हक्काचे महत्व तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव... विद्यार्थ्यांनी या विषयांची प्रभावीपणे मांडणी करत सामाजिक समतेचा संदेश ठामपणे पोहोचवला.
यावेळी सभापती तेजस्विनी बोराडे यांनी आपल्या मनोगतात या वक्तृत्व स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले व विशेषतः समाज कल्याण विभागाच्या सभापती सौ. संस्कृती सातपुते यांचं या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या पिढीवर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला. त्यांनी मनोगतातून स्पर्धकांचे कौतुक करून उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा केवळ शालेय उपक्रम न राहता सामाजिक समतेची जाणीव जागवणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले, तर बापूराव जमादार यांनी आभार मानले.