'... घटना पूर्व नियोजित नाही.' वकिलाचा युक्तिवाद ; खूनप्रकरणी दोघांना उच्च न्यायालयात जामीन

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा सत्र न्यायालयाने खून प्रकरणात जामीन अर्ज नाकारल्यावर 02 आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वतीने अॅड. जयदीप माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना जामीनवर मुक्त करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची हकीकत अशी की, आरोपी हे चिंचोली एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामास होते. पाण्याच्या हौदाजवळ आंघोळ करण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी पंकज सिंग व गुलशन कुमार यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणात आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांनी गुलशन कुमार यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून त्याचा खून केला, या आरोपावरून पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.

यातील आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडं धाव घेत ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. 

उच्च न्यायालयात जामीन अर्जाचे सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तीवादामध्ये, 'ही घटना पूर्व नियोजित नाही, क्षणार्धात घडलेली आहे. केस चा तपास पूर्ण झाला आहे, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. एस. साळगांवकर यांनी काम पाहिले.

To Top