स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कारवाई
सोलापूर : कारागृहाच्या उंच चार भिंतीआड बनलेल्या मैत्रीत एका सराईत गुन्हेगारास पुन्हा चार भिंती बोलावत आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात गेलेल्या आरोपीस जामीनावर सुटल्यानंतर त्याच्या कारागृहातील कैदी मित्रानं, दाखल गुन्ह्यातील त्याचं नाव कमी करण्याच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यात निर्जन स्थळी बोलवून 3.05 लाख रूपयांच्या मुद्देमाल जबरीने चोरून नेला. हा गुन्हा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार या 35 वर्षीय महिलेस गजाआड केलंय. तिच्या ताब्यातून 02.30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, असल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्षाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 2024 मध्ये सोलापूर शहर आयुक्तालय अंतर्गत फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी येथील जिल्हा कारागृहात होता. तेथे त्याची रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळ्या सुरेश पवार हा सुध्दा सोलापूर जिल्हा कारागृहात असल्याने त्या दोघांची कारागृहात ओळख झाली होती.
त्या दोघांची चालू महिन्यात कारागृहातून जामीनावर सुटका झाल्यानंतर ते दोघे मोबाईल फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्यान अजित उर्फ काळ्या सुरेश पवार (रा. नंदूर ता. मंगळवेढा) याने यातील फिर्यादीस वारंवार मोबाईलवरुन संपर्क साधून माझी सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे. त्यांना सांगून तुझे केसमधून नांव काढून टाकू, तू मला भेटायला ये, असं सांगितले होते.
त्यामुळे 09 एप्रिल, 2026 रोजी यातील सिक्वेरा व त्याच्यासोबत एक महिला असे दोघे जण अजित उर्फ काळ्या पवार यास भेटण्यासाठी मंगळवेढा तालुक्याच्या ब्रम्हपुरी शिवारातील हॉटेल उपसरपंच च्या पाठीमागे मुंढेवाडी जाणारे रोडवर निर्जनस्थळी दिलेल्या लोकेशनप्रमाणे ते एकत्र आले होते.
तेथे अजित उर्फ काळ्या पवार व सोबत असलेल्या लोकांनी सिक्वेरा व त्याच्या मैत्रिणीस शिवीगाळ-दमदाटी करुन त्यांचेजवळील 2,50,000 रुपयांची रोकड आणि मैत्रिणीच्या गळ्यातील सोन्याची चैन, फिर्यादीच्या गळ्यातील एक चांदीची चैन असा एकूण 3.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतल्याची फिर्याद ग्लेन पर्सी सिक्वेरा (वय- 48 वर्षे, रा. कल्याण डोंबिवली जि. ठाणे) याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल होता. 
या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकास योग्य त्या सूचना देऊन गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते.
14 एप्रिल रोजी सपोनि ज्ञानदेव वाघव त्यांच्या पथक या गुन्ह्याचे तपासकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माचणूर भागात हजर असताना, बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार तो गुन्हा करतेवेळी अजित उर्फ काळ्या सुरेश पवार याचेबरोबर त्याची पत्नी सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार ही सुध्दा होती.
सध्या ती तिच्या मौजे नंदूर येथील राहत्या घरी आली आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, तेथे जावून सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार ही मिळून आल्याने, तिस ताब्यात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता, तिने सांगितले की, या गुन्ह्यातील फिर्यादी याच्याबरोबर तिच्या नवऱ्याची जेलमध्ये ओळख झाली होती.
तिचा नवरा अजित उर्फ काळ्या, ती स्वत: आणि रणवीर (रा. मिरज, ता. सांगली) असे आम्ही तिघांनी मिळून यातील फिर्यादी यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यास त्याच्या गुन्ह्याचे कामी मदत करतो, असे सांगून त्यांना बोलावून घेऊन त्यांचेकडील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याचे सांगितले.
या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी रोख 1.75 लाख रुपये. 50, 000 रुपये किंमतीची एक सोन्याची चैन आणि 5,000 रुपये किंमतीची चांदीची चैन असा एकूण 2.30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तिच्याकडून जप्त करण्यात आला. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतिश बुरकुल यांचे पथक आणि मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बनकर, श्रीकांत देवकते यांनी बजावली.
🛑
