मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी 1690 + पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता (विसर्जन) मिरवणुकी रविवारी, 19 एप्रिल रोजी सोलापूर शहरात निघणार आहेत. हा सांगता सोहळा सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी शहर पोलिसांचा 03 पोलीस उप आयुक्त, 07 सहाय्यक पोलीस आयुक्त, 24 पोलीस निरीक्षक यांच्यासह 1690+ पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी असा बंदोबस्त असणार आहे. 

मिरवणुकीमुळे मिरवणुक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे स्वाभाविक आहे. या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे विचारात घेऊन खालील प्रमुख मार्गावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांसाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी यापूर्वीच प्रतिबंध लागू केले आहेत.

पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांनी रविवारी, 19 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. पासून ते 20 एप्रिल रोजीच्या पहाटे मिरवणूक संपेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता (विसर्जन) मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाणे व येणेस बंद करण्यात आले असल्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. 

.... बंद करण्यात आलेले मार्ग

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक

2. जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक

3. छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक-चार पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-डफरीन चौक-जुना एम्प्लायमेंट चौक- वाडीया हॉस्पीटल चांदणी चौक महापौर निवास - रेल्वे स्टेशन गांधी पुतळा - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक - मेकॅनिक चौक

4. संगमेश्वर कॉलेज ते जुना एम्प्लायमेंट चौक

5. डी. एम. आर. ऑफीस ते जुना एम्प्लायमेंट चौक.

या मार्गावर मिरवणुकीत सामील होणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतुकीस तसेच या मार्गावर वाहन पार्कीगसाठी बंदी राहणार.

त्यास पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाची वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील, अशी वाहने अपवाद असणार आहेत.

...बंद मार्गाकरिता पर्यायी मार्ग

1) विजापूर रोडकडून हैद्राबाद, तुळजापुर, पुणेकडे जाणारी वाहतुक पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक - संत तुकाराम चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड मार्गे इच्छित स्थळी

2) मंगळवेढाकडून येणारी होटगी रोड व विजापूर रोड कडे जाणारी वाहतुक, मरीआई चौक नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी- मोदी बोगदा, पत्रकार भवन मार्गे इच्छित स्थळी

3) जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनधारकाने जुना पुना नाका ( 54 मीटर रोड मार्गे) अवंती नगर - यश नगर रेल्वे बोगदा -जानकर नगर- सी.एन.एस. हॉस्पीटलमार्गे मरिआई चौक- ते इच्छित स्थळी

4) जुना पुना नाका चौकाकडून विमानतळ, जुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकाने जुना पुना नाका, जुना कारंबा नाका- जुना तुळजापूर नाका- बोरामणी नाका, शांती चौक, गुरुनानक चौक, महावीर चौक ते इच्छित स्थळी

5) विजापूर, मंगळवेढा कडून येणारे जड वाहतुक वाहनधारकाने नवीन केगांव बायपास रोडचा वापर करावा.

6) अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहतुक वाहनधारकाने नवीन अक्कलकोट नाका, शांती चौक, जुना बोरामणी नाका- मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा, असं पोलीस आयुक्तांच्या आदेशात सूचित करण्यात आलं आहे.

पोलीस आयुक्तांनी जारी केलेला आदेश,19 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. पासून ते दिनांक 20 रोजीचे पहाटे मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील. या  मिरवणुका शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेल्या बंदोबस्तात 61  सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 995 पोलीस अंमलदार, 600 गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाची 01 कंपनी असा जवळपास 1690+ कर्मचारी मिरवणूक मार्गावर ठिक-ठिकाणी तैनात असतील. 

या आदेशाचा भंग करणारा कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असंही पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी यापूर्वीच  म्हटलं आहे.

*****

To Top