सोलापूर : लोकशाही फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने बेगम पेठ येथील महानगरपालिका मुलांची उर्दू केंद्र शाळा क्रमांक 1 चे 100 आणि महानगरपालिका उर्दू केंद्र मुलींची शाळा क्रमांक 5 चे 180 विद्यार्थी-विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 180 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणीत त्यापैकी 20 विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदर्शनास आले.
या शिबिराचे उद्घाटन जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक रियाज बागवान, लोकशाही फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नेत्र तज्ञ वसीमराजा बागवान, एडवोकेट मुबीन बागवान तसेच शाळेच्या प्राचार्या माशाळकर, नसरीनबानो अल्ताफ सुरंजी आणि तौसीफ शेख हे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या नंबरची समस्या वाढत आहे. सुरुवातीला -0.25 किंवा -0.5 असा कमी नंबर असल्यास वेळेवर ब्लू फिल्टरचा चष्मा वापरल्याने 2 ते 3 महिन्यांत तो नियंत्रणात येऊ शकतो. मात्र वेळेत उपचार न केल्यास नंबर वाढून पुढे आयुष्यभर चष्मा लावावा लागू शकतो, असं वसीम राजा बागवान यांनी म्हटले.
लोकशाही फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शाळा आणि वस्त्यांमध्ये जाऊन मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करत आहे. संस्थेचा उद्देश केवळ उपचार करणे नसून, विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या शिबीरात चष्म्याची गरज असलेल्या 20 जणांना लवकरच लोकशाही फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मे वितरित करण्यात येणार असल्याचेही वसीम राजा बागवान यांनी सांगितले.