पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह 08 जणांविरुद्ध गुन्हा

shivrajya patra
सोलापूर : माहेरकडून पैसे, सोन्याचे दागिने घेऊन ये, असा तगादा लाऊन सासरी होत असलेल्या सततच्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून माहेरी वास्तव्यास असलेल्या  32 वर्षीय नर्गीसला तिच्या पतीने त्याच्या सासुरवाडीत पेट्रोल टाकून लायटरने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मजरेवाडी परिसरातील लोकमान्य नगरात बुधवारी रात्री दहा वाजण्याचा सुमारास घडली. याप्रकरणी तिच्या पतीसह 08 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, होटगी रस्त्यावरील मुलतानी बेकरी समोरील मगदूम हॉल शेजारी राहणारी सौ. नर्गिसला तिच्या सासरची मंडळी माहेरहून पैसा आणि सोन्याचे दागिने आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सासरच्या छळास कंटाळून सौ. नर्गिस तिच्या माहेरी राहत होती.

तिला भेटण्यासाठी सासरी आलेला तिचा पती फैजान शेख याने पत्नी नर्गीसला बोलण्याचे निमित्त करून सासू आणि मेहुणीस बाहेर जाण्यास सांगून घराच्या दाराला आतून कडी लावून घेतली. त्यावेळी फैजानने काही कळण्याच्या आतच कपड्याआड लपवून आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून लायटरने पेटवून देऊन पत्नी नर्गिसला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री घडली.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार तिचा पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, दिर फुरखान, जाऊ उमेरा, नणंद असिफा, तेहसीन आणि मौना (सर्व रा. मकदुम हॉलजवळ, होटगी रोड, सोलापूर) या 08 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वराळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top