जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व गॅसचा पुरेसा साठा !
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी इंधन पुरवठ्यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आज जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी Indian Oil Corporation Limited (IOCL), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) व Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) या तीनही तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सची तातडीची बैठक घेऊन इंधन साठा व पुरवठा याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर ही माहिती त्यांनी माध्यमांसाठी दिली.
पाकणी डेपो येथील तिन्ही कंपन्यांच्या ऑइल डेपो मॅनेजर्ससोबत चर्चा करून डिझेल-पेट्रोल साठ्याची स्थिती व इंधन वितरणाची तयारी याची खात्री करण्यात आली. तसेच जिल्ह्यात कुठेही तुटवडा भासणार नाही, याबाबत संबंधित कंपन्यांकडून लेखी आश्वासनही प्रशासनानं घेतलं आहे.
आपल्या वाहनासाठी आवश्यक तेवढेच पेट्रोल-डिझेल भरावे. अतिरिक्त साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी नागरिकांना केलं आहे.
दरम्यान, सर्व पेट्रोल-डिझेल वितरकांना आवश्यक तेवढाच पुरवठा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ड्रममधून इंधन वितरण होत असल्याच्या तक्रारी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शासकीय वाहनांसाठी आवश्यक राखीव साठा ठेवण्याच्या सूचना कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यात एलपीजी गॅसचाही कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.
“सोलापूर जिल्ह्यात इंधन व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत तुटवडा होऊ देणार नाही. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा,” असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केलं आहे.
