सोलापूर : हिंदू नववर्षानिमित्त सोलापूर स्मार्ट सिटी रोटरी क्लबने 'प्रार्थना फाउंडेशन' अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला. समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. 
कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष रोटे. अकबर नदाफ, सचिव रोटे. बसवराज बिराजदार, रोटे. नागेश शेंडगे, रोटे. महेश साळुंके, रोटे. अनिल चंडक, रोटे. भारत कदम, रोटे. संतोष सावळगी, रोटे. स्वाती मनसावाले, रोटे. शिवगंगा मैंदर्गी, रोटे. समीर नदाफ, रोटे. विशाल कोंटम आदी सदस्यांची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष रोटे. अकबर नदाफ यांनी विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. 
यानंतर 66 विद्यार्थ्यांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. 
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव रोटे. बसवराज बिराजदार यांनी उपस्थित मान्यवर व सदस्यांचे आभार मानले. तत्पूर्वी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असं सांगितले.
