कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी !

shivrajya patra


- कोल्हापूरच्याच वेदिका सासणेला अस्मान दाखवून महाराष्ट्र केसरी किताबावर नावं कोरले

- चांदीची गदा आणि सोनेट कारचे बक्षीस पटकावले 

- उपविजेती वेदीका सासणे बुलेटची मानकरी 

सोलापूर : सोलापुरात रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक  अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली. 

सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटात दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा तीन गुण मिळवून पहिल्या सत्रात पाच शून्य अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली.

दरम्यान अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासो लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, हिंद केसरी योगेश दोडके, आयोजक स्वाती अळळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेनजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, रमेश बारसकर, सागर कल्याणशेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळळीमोरे, योगेश बोंबाळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरवदे, उपस्थितांमध्ये सेरेंटिका रिन्युएबल्सचे सुरजीत नारायण, यांचेसह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

...........

महिलाकुस्ती स्पर्धेसाठी 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार - पालकमंत्री गोरे

पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन एक कोटी रुपयांचा निधी देते. परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासनाने 50 लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात सांगितले.

............

या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे युवराज केचे यांनी रांगड्या भाषेत सूत्रसंचालन केले. मुख्य कुस्त्यांमध्ये महिला कुस्तीपटू टाकल्यानंतर त्याचे बहारदार शब्दात सूत्रसंचालन केचे करीत होते.त्यांच्या जोडीला कुस्ती संपल्यावर चिअर गर्ल प्रमाणे ढोलीबाजाची साथ होती. 

.............

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अनेक लढती अटीतटीच्या झाल्या. या कुस्तीपटूना पाठीमागून डावपेच सांगताना प्रशिक्षकांची धडपड दिसत होती. या प्रशिक्षकांच्या बाजूला त्यांच्या कुस्ती केंद्रातील इतर खेळाडू देखील कुस्ती खेळणाऱ्या महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देताना दिसल्या.

...........

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐन उन्हाळ्यात होती. त्यात सोलापूरचे तापमान 40 अंशापर्यंत होते. परंतु आयोजकांनी फॅन आणि कुलरची व्यवस्था करून तेथील तापमान मेंटेन ठेवले. ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांना पाहता यावी यासाठी दोन मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. 

एवढी मोठी स्पर्धा असूनही तुलनेने प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होता. परंतु महिला प्रेक्षक उपस्थिती उल्लेखनीय होती. या भव्य स्पर्धेचे सह प्रायोजक हरितऊर्जा निर्मिती मधील अग्रेसर कंपनी सेरेंटिका रिन्यूएबल्स असून ह्याचे आयोजन निरझरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. 

...........

शब्दांकन शिवभार : रोहन नंदाने, सोलापूर.

To Top