सोलापूर : मेडिकल कॉलेज पतसंस्थेने आपल्या पारदर्शी स्वच्छ व विना राजकारण कारभार करीत 50 वर्षे इतका मोठा कालखंड गाठला आहे. पतसंस्थेची विश्वासार्हतेची तीच वाटचाल आजही सुरू आहे. सहकार क्षेत्रातील हे विरळा उदाहरण असावे, पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आदर्श उभा केला आहे, असे गौरवोद्गार माजी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी काढले.
मेडिकल कॉलेज पतसंस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. घाटे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते.
यावेळी विचारपीठावर श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्वीक जयकर, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डी. टी. जोशी, कवी देवेंद्र औटी आणि रमाकांत फुटाणे यांची उपस्थिती होती. 
प्रारंभी दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डी. टी. जोशी यांनी प्रास्ताविकात, मेडिकल कॉलेज पतसंस्था स्थापनेपासूनच्या वाटचालीचा उजाळा देताना, संस्थेने सभासदांसाठी राबवलेल्या अनेक योजनेमुळे सभासदांना झालेला आर्थिक फायद्याचा उल्लेख करुन संस्थेने आर्थिक क्षेत्रासह सांस्कृतिक सामाजिक योगदानाची माहिती दिली.
सभासदांच्या पाल्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. सर्व सभासदांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. आर. आय. तळे, बी. टी. जोशी, रविंद्र नायडु, वाय.आर पांढरे, विद्यमान चेअरमन सौ. वर्षा कमटम यांच्यासह संचालक मंडळ सर्व सभासद उपस्थित होते.
सुत्रसंचालन कवी देवेंद्र औटी यांनी केले, तर संस्थेचे लिपीक एम. एन. बोलाबत्तीन यांनी आभार मानले.
फोटो ओळी : डॉ. व्हि. एम. मेडिकल कॉलेज कर्मचारी सह.पतसंस्था सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे उदघाटन हुतात्मा मंदिरात अधिष्ठाता डॉ. ऋत्वीक जयकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, संस्थापक अध्यक्ष डी. टी. जोशी, वर्षा कमटम यांच्यासह अन्य मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.
