सोलापूर : राहते घराच्या कंम्पाऊंडमध्ये आणि परिसरात गांजाच्या झाडांची लागवड करून गांजा विक्रीत गुंतलेल्या आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलीय. रजाक गफुर शेख (वय-49 वर्षे) असं आरोपीचं नांव आहे. त्याच्या ताब्यातून एकूण 04,39,900 रूपये किंमतीचा 21.439 किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. आरोपी रजाक शेख याला न्यायालयासमोर उभं केलं असता, न्यायालयानं त्यास 05 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासोबत पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत सोमवारी,30 मार्च रोजी गस्त करीत असताना जुना देगांव नाका थोबडे वस्ती येथील रोडचे डाव्या बाजूस आतमध्ये झाडाखाली एक इसम संशयीतरीत्या प्लास्टीक पिशवी घेऊन बसल्याचे दिसून आले.
पथकानं त्याच्या हालचालीवर बराच वेळ लक्ष ठेवले असता, तो त्याच्या जवळील पिशवीतील पुड्या विक्री करत असल्याचे दिसून आले. तो त्या ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचा प्रथमदर्शनी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानं त्याचं नांव रजाक गफुर शेख (व्यवसाय- मजुरी, रा. घर नं-05, थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे असल्याचे सांगितले.
तद्नंतर त्याचे कब्जातील प्लास्टिक पिशवीबाबत विचारपूस करुन प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता, त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच अधिक चौकशीमध्ये त्यानं त्याच्या राहते घराच्या कंम्पाऊंडमध्ये आणि घरासमोरील परिसरामध्ये एकुण 59 गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे आढळून आले.
त्यानंतर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत रजाक गफुर शेख याचे कब्जातील प्लास्टीक पिशवीमधील 227 ग्रॅम गांजा तसेच त्याने लागवड केलेली 59 गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन 21.212 किलो ग्रॅम असा एकूण 21.439 किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
रजाक गफुर शेख याने विक्री करीता स्वतःच्या ताब्यात गांजा बाळगल्याचे तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम-20 (अ), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयासमोर उभं केलं असता, त्यास 04 एप्रिलपर्यंत पोलीस ठेवण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्वीनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिध्दाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळू काळे यांनी केली.