'लगान' चे पटकथाकार कुमार दवे यांचं शुक्रवारी व्याख्यान

shivrajya patra
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या लगान या चित्रपटाचे पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे व्याख्यान शुक्रवारी, 03 एप्रिल रोजी सायंकाळी 06. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. 

ब्रिटीश राजवटीमध्ये देशाच्या एका गावात भारतीय तरूणांनी क्रिकेटच्या माध्यमातून इंग्रजांना हरवून भारताचा स्वाभिमान कशा प्रकारे टिकवला आणि ब्रिटीश राजवटीला कशा प्रकारे हादरा दिला, याचे चित्रण असलेला प्रसिध्द अभिनेता अमीर खान यांचा लगान हा चित्रपट संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात गाजला होता. 

त्या चित्रपटाची पटकथा कशा प्रकारे लिहिण्यात आली, त्यावेळी घडलेले अनेक किस्से या चित्रपटाचे पटकथाकार असलेले कुमार दवे हे आपल्या व्याख्यानातून सांगणार आहेत. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आजच्या तरूण पिढीला कुमार दवे यांचे व्याख्यान प्रेरणादायी ठरणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात  त्यातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

पटकथाकार कुमार दवे यांच्या व्याख्यानाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा. दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अभय जोशी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत.

To Top