एन. के. किड्स स्कूल चा भावनिक वातावरणात निरोप समारंभ

shivrajya patra
बाळे : राजेश्वरी नगर येथील एन.के. किड्स स्कूलचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात, पण तितक्याच भावनिक वातावरणात पार पडला. लहानग्यांच्या निरोपाच्या क्षणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे डोळे पाणावलेले दिसत होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी आपल्या मनोगतातून पालकांना महत्त्वाचा संदेश दिला. “लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलचा अतिरेक त्यांच्या नाजूक डोळ्यांवर विपरीत परिणाम करतो,” असे सांगत त्यांनी पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले. 
तसेच, “मुलांचे संगोपन करताना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण शाळेपेक्षा मुलं जास्त वेळ पालकांच्या सहवासात असतात,” असेही त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश नारायणकर होते. त्यांनी आपल्या भाषणात बँकेच्या ‘विद्या धन’ योजनेची माहिती देत लहानपणापासून बचतीची सवय कशी लावावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर संचालक राजा आलोरे, संस्थेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, ‘दिव्य मराठी’चे उपसंपादक विजय गायकवाड, पत्रकार परशुराम कोकणे, ट्रस्टी विकास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात वर्षभरात आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विशेष आकर्षण ठरलेल्या ‘रंगांचा दंगा’ या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. 

लहानग्यांनी सादर केलेल्या निरोपगीतांनी आणि छोट्या छोट्या आठवणींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. या वेळी काही पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही शाळा म्हणजे आमच्या मुलांचे दुसरे घरच आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेड शिक्षिका दिपाली कुलकर्णी, अश्विनी सिंघम, पुनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर व सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

निरोप समारंभाच्या शेवटी लहानग्यांनी शाळेला आणि शिक्षकांना दिलेला निरोप प्रत्येकाच्या मनात एक गोड आठवण बनून राहिला. “आज निरोप आहे, पण या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील,” अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
To Top