राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे थाटात उद्घाटन
सोलापूर : गडचिरोलीपासून ते पार रत्नागिरीपर्यंतचे राज्यभरातून आलेले सर्व खेळाडू अगदी 06 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतचे चांगले क्रीडा नैपुण्य या ठिकाणी दाखवित आहेत. यांचे कौशल्य बघून नक्की वाटते की, येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोलापूरचं नांव चषकावर कोरले जाईल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय क्रीडांगण नेहरूनगर येथे १० वर्षाखालील व १३ वर्षाखालील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा विजापूर रस्त्यावरील शासकीय क्रीडांगणावर चार दिवस चालणार आहेत.
गुरुवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. ओंबासे बोलत होते.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, सहसचिव सोनल बुंदेले मॅडम, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अजिंक्य रणदिवे, वास्तुविशारद अमर नागमोडे, क्रीडा अधिकारी म्हणू. निवड झालेले विठ्ठल भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना हरिदास रणदिवे आणि सांगितले की, शाळेच्या सर्व स्तरांवरती क्रीडा हा विषय महत्त्वाचा अत्यावश्यक विषय म्हणून समाविष्ट झाला पाहिजे, आणि त्याचं गुणदान टक्केवारीमध्ये आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या क्रीडाची बीजे विद्यार्थी दशेपासूनच रोवली जातील.
यावेळी प्रमोद चांदूरकर सरांनी सांगितलं की, देशाच्या टीम मध्ये 70 टक्के महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, हे महाराष्ट्रातल्या पालकांचे क्रीडा मार्गदर्शकांचे आणि सर्व जिल्हा संघटनांचे यश आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास 750 पेक्षा अधिक खेळाडू 04 दिवस या ठिकाणी नेहरूनगर इथं आपल्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावता घाडगे यांनी केले. याप्रसंगी नव्याने पदभार स्विकारलेले क्रीडा अधिकारी विठ्ठल भालेराव यांचा डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सर्व पालकांनी, खेळाडूंनी, क्रीडा मार्गदर्शकांनी आणि ऑफिशिअल्सने जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व टीमच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले. आज गुरुवारी इंडियन राऊंडच्या स्पर्धा संपन्न झाल्या. शुक्रवारी रिकर्व्ह आणि कपाऊंड राऊंडच्या स्पर्धा होणार आहेत.
