‘घबाड कुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स; १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाड कुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होतोय. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.
निर्माते रसिक कदम यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाड कुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. 
‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. भय, थरार, रहस्य असा भरगच्च मसाला असलेला ‘घबाड कुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ असणार आहे.
देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाड कुंड’ चित्रपटात आहे.
महिला दिनाचं औचित्य साधत ‘घबाड कुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा आणि चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. 
याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरवचिन्हे आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यासोबत स्टायलिश आणि ग्लॅमरस फॅशन शोची शानदार झलक उपस्थितांनी अनुभवली. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे निर्माते रसिक कदम यांची ‘आयकॉन दी स्टाईल’ कंपनी आता ‘घबाड कुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी मनोरंजन क्षेत्रात जोरदार पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.
याप्रसंगी निर्माते रसिक कदम म्हणाले,‘घबाड कुंड’ हा एक वेगळा आणि रोमहर्षक अनुभव असणार आहे. उत्तम कथानक, दर्जेदार सादरीकरण आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्यांचा उत्तम संगम या चित्रपटात पहायला मिळेल. 
‘मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचं स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न साकार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.
नव्या पिढीला अशी वेगळी आणि मोठ्या कॅनव्हासवरची संकल्पना खूप आवडते. त्यांच्या आवडीचा विचार करूनच हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे मत दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
'घबाड कुंड' चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचं आहे.
साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिनगारे व साउंड डिझाइन मानव श्रोत्रिय (एम पी एस सी) यांचे आहे. मॅनेजर विष्णु घोरपडे आहेत.'घबाड कुंड' चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच साकारत असलेल्या या 'युनिव्हर्स' मुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
