रमजान महिन्याचे पालन करतांना या वर्षी संमिश्र ऋतूचा सामना करावा लागत आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्ह आणि सायंकाळी थंड ऋतू असा सध्या मोसम आहे. वातावरण बदलत असल्याने अनेक जण आजारी पडत आहेत. मागील काळामध्ये तीव्र उन्हाळ्यामध्ये देखील रमजान महिना आलेला आहे.
तरी सुद्धा या बदलत्या ऋतूमध्ये सर्वजण पाणी पाणी करीत असतांना अल्लाहच्या प्रति श्रध्दा बाळगणारा खरा भक्त कितीही तीव्र उन असले तरी पाण्याकडे पाहत सुध्दा नाही. त्याची श्रध्दा व भक्ति ही त्याला त्याच्या निश्चित ध्येयापर्यंत नेण्यास कटिबध्द असते. या यावर्षी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या संमिश्र वातावरणात रमजान महिना आलेला आहे, ही पण आपली परीक्षाच आहे.
रोजे धरले म्हणून केवळ उपाशी राहून चालत नाही तर शरीराच्या प्रत्येक अवयवातून याचा प्रत्यय यायला हवा. अकरा महिने स्वच्छंदी जीवन जगून आपल्या मध्ये ज्या वाईट सवयी रुढ झालेल्या असतात. त्या दूर करण्याचे प्रशिक्षण रमजान महिन्यात रोजाच्या रुपाने आपण घेत असतो. शरीराच्या प्रत्येक अंगाशी रोजा निगडीत असतो.
खोटे न बोलणे, शिव्याशाप न देणे, निंदानालस्ती न करणे, अश्लील न बोलणे हा जीभेचा रोजा तर कुणावरही जुलूम न करणे, मारहाण न करणे हा हाताचा रोजा, वाईट न बघणे हा डोळ्यांचा रोजा तर चुकीच्या ठिकाणाकडे न जाणे हा पायांचा रोजा समजला जातो.
रोजे धरुनही जर कुणी चुकीचे वागत असेल तर अशा रोजेदाराशी अल्लाहला काही ही देणे घेणे नाही. दैनंदिन जीवनात सचोटी, दया, करुणा, सहकार्य वृत्ती असणे आवश्यक आहे व या सर्व गुणधर्माची निर्मिती व जोपासना करण्याचे महत्वपूर्ण कार्य रोजातून होत असते.
अल्लाहच्या प्रकोपाची अनामिक भिती मनात बाळगून रोजेदार आपला रोजा पूर्ण करीत असतो व हे करतांना सर्व प्रकारच्या वाईट बाबीपासून स्वतःचा बचाव ही करीत असतो. रोजेदाराची ही सचोटी व त्याचे हे सद् वर्तन त्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते.
