अभिजात मराठी भाषा घडविण्याचे काम सावरकरांनी केले : योगेश सोमण

shivrajya patra

सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी असंख्य शब्दांचा समूह देऊन मराठी भाषेला अभिजात केले, असे प्रतिपादन लेखक सिने नाट्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने शनिवारी, 28 फेब्रुवारी रोजी अँफी थिएटरमध्ये आयोजित सावरकर आणि मराठी भाषा या विषयावरील व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी होते. 

राष्ट्रप्रेम आणि पुस्तक प्रेम  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपणापासूनच होते. सावरकरांनी जे धैर्य दाखवले ते कुणीच दाखवू शकले नाही. लेखक, चरित्रकार, नाटककार, राष्ट्रप्रेमी, क्रांतिकारक अशा विविध भूमिकेतून सावरकर स्वयं घडले. सावरकरांनी वेद उपनिषदाचे वाचन ही केले. 22 जून 1897 रोजी दामोदर हरी चाफेकर यांचे शौर्य हे सावरकरांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच क्रांतिकारक घडला. 

आपल्या लेखणीतून लिखाणातून सावरकरांनी राष्ट्रप्रेम जागृत केले. ब्रिटिश राजवटीत मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. अनेक शब्द इतर भाषेतील वापरले जायचे,  क्रांतिकारक राष्ट्रप्रेमी सावरकरांना त्याचे वाईट वाटायचे, त्यातूनच त्यांनी मराठी भाषेसाठी अनेक शब्द दिले. असेही योगेश सोमण यांनी सांगितले. 

मराठी भाषा आणि सावरकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सावरकरांचे कर्तुत्व आणि क्रांतिकारी विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या जीवनावरील घटनांचे अनेक चित्रपट तयार व्हायला पाहिजे. त्यासाठीच सावरकरांच्या जीवनावर वेब सिरीज तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे,असेही योगेश सोमण यांनी सांगितले

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. 

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश परदेशी यांचा परिचय अमोल धाबळे यांनी करून दिला. वक्ते योगेश सोमण आणि प्रमुख पाहुणे दिनेश परदेशी यांचे स्वागत आणि सत्कार अध्यक्षा रेणुका महागावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान सावरकर यांचे ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झाले, त्या ठिकाणाला भेट देणारे सुधाकर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तर प्राध्यापक सुहास पुजारी यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केले तर प्रकाश मोकाशे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

To Top