पत्रकार दिनी स्व. वैद्य, नल्लामंदू , मठपती आणि सोनावणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे " आदर्श पत्रकार पुरस्कार" अनुक्रमे कुलकर्णी, पाटील, शेख आणि गोसावी यांना प्रदान
सोलापूर : पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो, म्हणून हे डोळे नेहमी स्वच्छ असले पाहिजेत. शब्दांत मोठी ताकत असते हे लक्षात घेऊन पत्रकारांनी शब्दांचा वापर जपून करावा, तरच समाजाचे प्रबोधन होईल, असं आवाहन डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
'दर्पण' कार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी, 06 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनेही मंगळवारी दुपारी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
प्रारंभी 'दर्पण' कार स्व. बाळशास्त्री जांभेकर व स्व. रंगा अण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. पुरस्कार निवड समितीचे अय्यूब अहमद यांनी उर्दू शायरीसह सर्वांचे स्वागत केले. सचिव. प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत पत्रकार संघाचे अहवाल सादर केले. अध्यक्ष अशोक मठपती व सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व मान्यवरांना शाल-बुके व स्मृति चिन्ह देऊन सत्कार केला.
या नंतर
🔸'संचार' कार स्व. रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दै. सुराज्यचे उपसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी,
🔸'कासिद' कार स्व. अ. लतीफ नल्लामंदू यांचे नावे असलेला पुरस्कार दै. 'लोकमत' चे उपसंपादक अप्पासाहेब पाटील,
🔸बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्व. बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र टाईम्स ऑन लाईनचे वार्ताहर इरफान शेख
तर
🔸स्व. मारुती सोनावणे यांच्या स्मरणार्थ दै. संचार चे माढा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार दिलीप गोसावी
यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, पु. अ. होळकर विद्यापीठचे रजिष्ट्रार डॉ. शिवाजी शिंदे व निवड समितीचे अय्यूब नल्लामंदू, यांच्या उपस्थितीत कै . रंगा अण्णा वैद्य सभागृह येथे गौरव पत्र, 05 हजार रुपये रोख सन्मान चिन्ह, पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. 
सोलापूर विद्यापीठाचे डॉ. शिवाजी शिंदे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले - प्रिंट मिडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असो, सर्वांनी चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे, असं आवाहनही प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. शिंदे यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देत बाळ शास्त्री जांभेकरांची स्वच्छ पत्रकारिता आत्मसात करावी, पत्रकार समाजातील सार्वजनिक मुद्दे उपस्थित करून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे प्रामाणिक कार्य करावे. वृतपत्र हा चौथा स्थंभ असल्यामुळे याचे जतन सर्वांनी केलं पाहिजे, असं आवाहन केले. यावेळी गाढे अभ्यासक योगेश तुरेराव यांनी आर. एन. आय. च्या नवीन तरतुदीवर मार्गदर्शन केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका तथा प्रा. मोहिनी पत्की, पत्रकार प्रशांत जोशी, दशरथ वडतिले, नागेश कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, विश्वनाथ वनकोरे, श्रीशैल चिंचोळकर , डॉ. शफी चोबदार, प्रशांत जोशी, जुंजा, नागेश दांतकाळे, इक्बाल बागबान, बाळासाहेब वाघमोडे, देविदास उत्पात, इम्तियाज काजी, नागेश कुलकर्णी, ॲड. काटुळे, सीए आनंद करवंदे, धनंजय कुलकर्णी, योगेश तुरेराव, शौकत काझी, मजहर अल्लोळी, वसंत चौधरी इ. चा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्राप्तपैकी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गोसावी व पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी ज्येष्ठ पत्रकार स्व. रंगा अण्णा वैद्य, बाबुराव जक्कल, अ. लतीफ नल्लामंदू, रमेश महामुनी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत संघाने कौतुक केल्याबद्दल आभार मानले .
कार्यक्रमाचं सुत्रसंचालन प्रा. देविदास उत्पात यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
