गुन्हे शाखेची देशी-विदेशी दारू विक्री अन् वाहतुक करणाऱ्या विरुद्ध कारवाई; आरोपींमध्ये शॉप मालकाचाही समावेश

shivrajya patra

सोलापूर : शहरात अवैध मद्य निर्मीती, विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासंबंधी राबविलेल्या विशेष मोहिमेत पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गेल्या 03 दिवसांत 04 गुन्हे दाखल केले. या प्रकरणी एका महिलेसह 07 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास 04 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींमध्ये एका वाईन शॉप मालकाची समावेश आहे. सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही उल्लेखनिय कामगिरी मानली जात आहे.

01) 09 जानेवारी रोजी सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारे सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कवठे येथील कुमार ऊर्फ बाबु पांडुरंग चव्हाण यांच्या शेतात सुरू असलेल्या गुळमिश्रीत अवैध हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टीवर छापा टाकुन कारवाई केली. त्यात 1285 लिटर गुळमिश्रीत रसायन व 80 लिटर तयार केलेली हातभट्टी दारु असा 52, 975  रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नाश केला. 

या कारवाईत संजय गोपीचंद राठोड, कुमार ऊर्फ बाबु पांडुरंग चव्हाण आणि प्रियंका कुमार चव्हाण (सर्व रा. भोजप्पा तांडा, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द सलगरवस्ती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखलकरण्यात आला.

02) 12 जानेवारी रोजी सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकास प्राप्त गोपनिय बातमीदारामार्फत हॉटेल अॅम्बेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर अमोल बाळासाहेब भोसले हा विविध देशी-विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या बाळगुन विक्री करण्याकरीता घेऊन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. 

त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करुन एकूण 01, 03, 660 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या व 01 दुचाकी मोटर सायकल जप्त करण्यात आली. अमोल बाळासाहेब भोसले (रा. मु. पो. कोंडी ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

03) 12 जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडील पोसई मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकास गोपनिय बातमीदारामार्फत गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात नरेंद्र रामलू कोंडा हा विविध देशी-विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या ऑटो रिक्षामधून विक्री करण्याकरीता घेऊन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. 

त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करुन एकूण 01, 32, 500 रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व 01 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली. या प्रकरणी नरेंद्र रामलु कोंडा (रा. गांधीनगर, हनुमान मंदिराजवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्याविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

04) 12 जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे सपोनि शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथक यांना गोपनिय बातमीदारामार्फत कर्णिक नगर येथील स्वातंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉपजवळ संदिप विष्णू शिंदे हा विविध देशी-विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या बाळळून विक्री करण्याकरीता घेऊन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. 

त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करुन एकुण 01, 12, 880 रुपये  किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या व एक मोटर सायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी संदिप विष्णू शिंदे (रा. मु. पो. दहिटणे, सोलापूर) आणि गोल्डन वाईन शॉप (अशोक चौक, सोलापूर) च्या मालकाविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्वीनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, पो.स.ई. मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

To Top