दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त 13, 14 आणि 15 जानेवारीदरम्यान प्रथमच 03 दिवसीय जिल्हास्तरीय कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी, दुपारी 04 वाजता होणार असून या प्रदर्शनात नामवंत कृषी आणि औजारे कंपन्या सहभागी होणार असून शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत केले.
दरवर्षी 12 ते 16 जानेवारी असे 05 दिवस श्री मळसिध्द यात्रा संपन्न होते. या दिवसात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीपासून श्री मळसिध्द यात्रेनिमित्त 03 दिवस शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्ष दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करावेत, अशी सूचना पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीमध्ये केले होते. त्यानुसार शेतकरी बांधवांसाठी मळसिध्द यात्रा कमिटीने यंदाच्या वर्षी मंगळवारी,13, 14 आणि 15 जानेवारी दरम्यान 03 दिवस सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचं श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक यांत्रिक अवजारे, मशिनरी, यंत्रसामग्रीची माहिती व्हावी, नवनवीन पीक पद्धती, आधुनिक व सेंद्रिय शेती कसे करावेत, उत्पादन वाढीसाठी शेतीत काय प्रयोग करावेत, यांची माहिती शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनात मिळणार आहे. तसेच विविध ट्रॅक्टर, ट्रक, टू व्हीलर, विविध नवनवीन अवजारे, मशिनरी यासह इतर वस्तूंचे स्टॉल उभारले आहेत.
या प्रदर्शनात वळू, गाय, बैल, म्हैस, घोडे, शेळी आदीचे पशु प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनासाठी पत्र्याचे भव्य मंडप, हिरवे मॅट, हायमास्ट दिवे, विविध कंपन्यांसाठी मोठे स्टॉल, पाणी, सुरक्षा रक्षक, अग्नीशामक दल, रूग्णवाहिका यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिक आणि शेतकरी बांधवांची मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार आहे.
या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला आरकेरीचे मठाधीश श्री औदुसिध्द महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. आमदार सुभाष देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, आप्पाराव कोरे,जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, अप्पर तहसीलदार विष्णू बुट्टे, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, सरपंच अनिता कोरे, अर्जुन टेळे, रमेश नवले, मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, उपसरपंच भगवान व्हनमाने, संतोष शहा, अनंत म्हेत्रे, रमेश फरताडे आदी उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय.
या पत्रकार परिषदेस श्री मळसिध्द देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पत्रकार पंचाक्षरी स्वामी, धनंजय पाटील उपस्थित होते.
