खूनाच्या प्रयत्नासह 09 गंभीर गुन्हे दाखल; अवधुत शेंडगे M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अवधुत शेंडगे याला M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित केल्याने त्यास येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ग्रमीण हद्दीतील वाळू तस्करी, शरिराविषक, मालाविषयक, अवैधदारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून त्यांच्याविरुध्द M.P.D.A. कायद्यान्वये यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरिराविषक तसेच वाळु तस्करी, अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावे, तसेच प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश यापूर्वीच  दिले आहेत. 

वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधुत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी, वेळापूर, ता. माळशिरस ) याच्याविरुध्द शरिराविषक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, घातक हत्याराचा वापर करून दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, असे 09 गुन्हे वेळापूर तसेच अकलुज पोलीस ठाणे येथे दाखल आहेत. 

त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरी देखील पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्यामुळे अवधुत शेंडगे याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यामार्फतीने सहा. पोलीस निरीक्षक, वेळापूर पोलीस ठाणे यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडे M.P.D.A. कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके (अकलुज), अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (ने. स्थानिक गुन्हे शाखा), सहा. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पो.उप.नि. शेळके, पो.हे.कॉ. अनिस शेख, पो.हे.कॉ. मोहन मनसावाले, सपोफौ अंडगाळे, पोहेकॉ यश आनंदपुरे, पो.हे.कॉ. पाटील, पो.कॉ. माळी, पो.कॉ. पांढरे, पो. कॉ. हिंगणगावकर, पो.कॉ. काटे, तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे, नायब तहसिलदार विलास म्हेत्रे यांनी पार पाडलीय.

To Top