सोलापूर : पार्टीसाठी तगादा लावला, म्हणून मित्र विनायक हक्के याचा डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नागेश अण्णाराव चिक्कळे (रा. जुळे सोलापूर) याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर होऊन न्यायमुर्तींनी आरोपीचे जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, विनायक हक्के व आरोपी नागेश चिक्कळे हे दोघे मित्र होते. घटनेदिवशी, 01 जुलै 2024 रोजी विनायक हक्के याने त्याचा मित्र नागेश दारु पिण्यासाठी पैसे दे, म्हणून तगादा लावला होता. या कारणावरुन विनायक व नागेश यांच्यात वाद-विवाद होऊन धक्का-बुक्की झाली व त्यातून झालेल्या भांडणात रागाच्या भरात आरोपी नागेश चिक्काळे याने विनायक हाके याचा डी मार्ट समोरील पटांगणात रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
आरोपी नागेश चिक्काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात येथे जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली.
या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी व मयत हे दोघे जिवलग मित्र होते, त्यामुळे आरोपीने खून करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा विश्वासार्ह नाही, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून न्यायमुर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. मनोज गिरी यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रियांका राणे यांनी काम पाहिले.
नवीन फौजदारी कायदा, भारतीय न्याय संहिता 01 जुलै 2024 पासून अंमलात आला. या नवीन कायद्यान्वये दाखल झालेला हा महाराष्ट्रातील दाखल झालेला पहिलाच खूनाचा गुन्हा होता.
