सोलापूर : कर्तव्यदक्ष अधिकारी या नात्यानं, धाडसी पाऊल उचलून सोलापूर शहर डॉल्बी मुक्त करण्यात आपण महत्वपूर्ण भूमिका बजावलीत, त्याच धर्तीवर सोलापूर अवैध धंदे मुक्त करण्यात यावं, अशा मागणीचं निवेदन सोमवारी संभाजी बिग्रेडच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राज कुमार यांना देण्यात आलंय.
पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या 07 पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या तक्रारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं यापूर्वीच गेलेल्या आहेत.
सोलापूर दौऱ्यावर असताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडेही अवैध व्यवसायांसंबंधी निवेदन देऊन ते बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. गृह राज्यमंत्र्यांनी, त्यावर कठोर कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते, मात्र पोलिस प्रशासनाचे त्याकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात करण्यात आलाय.
सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मटका-जुगार अड्डे, अवैधपणे दारु विक्री, रासायनिक ताडीची विक्री, क्रिकेट सट्टा, बिअर बार च्या नावाखाली परमिट रुम, कपल फ्रेंडली रुम च्या नावाखाली अवैध लॉजिंग वऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार असे एक ना अनेक बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. 
अशा धंद्यामुळे यामुळे शहरातील तरुणाई व्यसनाधीनतेकडं वळत आहे. या सर्व अवैध धंद्यास पोलिस प्रशासनाची मूक संमती आहे काय, असा सवाल संभाजी ब्रिगेड करून उपस्थित करण्यात आलाय. पोलिस दलात अस्तित्वात नसलेल्या मात्र कार्यरत 'वसूलदार' पदावर अनेक अंमलदार ठाण मांडून आहेत.
इथं जी वसुली होते, त्याचे पुरावे संभाजी ब्रिगेडकडे आहेत, असा इशाराही त्या निवेदनात देण्यात आला आहे. अशा अवैध व्यवसायात आणि धंद्यात भरडल्या गेलेल्या तरुणांनं गतवर्षी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता. 
त्याच्या कुटुंबीयांच्या पापण्या सुकण्यापूर्वीच काही महिन्यापूर्वी एका तरुणानं, त्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांची नांवे 'आखरी चिठ्ठी' त लिहून ईहलोकांचा निरोप घेतला होता. अशा अवैध धंद्यामुळे तरुणाई देशोधडीला लागत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे.
काही महिन्यापूर्वी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोलापुरातील अवैद्य बंद करण्याचे आदेश दिलेले होते. तरीही फारसं चित्र बदललं असल्याचं दिसून येत नाही. येत्या सात दिवसांनंतर हे असंच चालू राहिलं तर त्याचा 'कच्चा चिट्टा' राज्य शासनाकडे पाठवण्यापूर्वी चौका-चौकामध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून त्याविरुद्ध आवाज उठवण्यात येईल, असंही त्या निवेदनात उल्लेखिले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महानगर अध्यक्ष शिरीष जगदाळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
