03 जानेवारी 2026,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "सांस्कृतिक सृजनकार" हा रचनात्मक पुढाकार घेऊन,"लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर साजरा करीत आहेत. 3 जानेवारी 2026 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या या नाट्यमालिकेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित “लोक- शास्त्र सावित्री” नाटकाचा जागर राज्यभर प्रस्तुत होणार आहे.
भांडवलशाही आणि धर्मांध सत्ता आज अर्ध्या लोकसंख्येचा मताधिकार विकत घेत आहेत. भावनिक नातेसंबंधांच्या गोड भाषेत, कौटुंबिक संबोधनांच्या मोहजालात अडकवून, फक्त चिल्लर नाण्यांच्या मोबदल्यात त्यांना तथाकथित ‘सन्मान’ दिला जातो. पण हा खरा सन्मान आहे का? की आत्मसन्मानाचा सौदा?
स्वावलंबनाचा पाया म्हणजे रोजगार. मात्र भांडवलशाही व धर्मांध सत्तेने तरुणांचा रोजगार हिरावून घेतला आहे. रोजगार देण्याऐवजी केवळ क्षुल्लक मदत वा ‘योजना’ या नावाखाली त्यांचे मत विकत घेणे, ही लोकशाहीसाठी घातक पद्धत आहे. मग प्रश्न उभा राहतो: मत विकणे म्हणजे आत्मसन्मान आहे का? विकलेला समाज लोकशाहीचा खरा रक्षक ठरू शकतो का?
अर्ध्या लोकसंख्येला वर्ण व्यवस्थेच्या गुलामीत व पितृसत्ताक बेड्यांमध्ये जखडून ठेवले जाते. अशा साखळदंडातून तिला खरेच संविधानिक अधिकार, न्याय, समता आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळणार आहे का?
शिक्षण माणसाला तर्कबुद्धी, विवेक व विश्लेषणक्षमता देते, असे आपण मानतो. पण आजची तरुण पिढी जेव्हा वर्णवाद, पितृसत्ता, धर्मांधता आणि भांडवलशाहीच्या बेड्यांनाच ‘मुक्तीचा उत्सव’ मानते, तेव्हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा शिक्षणाची कल्पना केली होती का? महात्मा ज्योतिबा फुले यांनी हाच मार्ग ‘मुक्तीचा’ मानला होता का? सावित्रीबाई फुले यांनी अर्ध्या लोकसंख्येच्या शिक्षणासाठी दिलेली आहुती यासाठी होती का की त्या शिक्षित होऊन पुन्हा वर्णवाद, पितृसत्ता आणि धर्मांधतेच्या जोखडात अडकतील?
याच प्रश्नांची जाणीव करून देतंय समतेचा यलगार असणारं नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’ ज्याची निर्मिती व दिग्दर्शन सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि जागतिक दृष्टी असलेले रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी केलं आहे. हे नाटक लोकशाही, समता,न्याय आणि संविधानिक मूल्यांचा ध्यास घेणारं एक जिवंत आंदोलन आहे.
"थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या प्रस्तुतीतून आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात समता, समानता, न्याय आणि संविधाननिष्ठ दृष्टिकोन जागवत आहे.आपण सर्वजण या आणि या सृजन महोत्सवाचा भाग होऊया!
हम हैं!
आयोजनासाठी संपर्क :
रंगकर्मी - सायली पावसकर
+91 96534 37014
कोमल खामकर +91 96536 91401
