स्वामी भक्ती घरा-घरापर्यंत नेण्याचं माध्यम बनता आलं हेही भाग्यचं : प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर

shivrajya patra

दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला घेतले स्वामी दर्शन !

अक्कलकोट : ' जय जय स्वामी समर्थ ' मालिकेसाठी स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी अभिनय चाचणी दिल्यावर ही संधी मिळेल, असं वाटलं नव्हतं, त्यातच समर्थांच्या इच्छेनंचं सुसंधी मिळाली, ही भूमिका साकारणं प्रचंड आव्हानात्मक होतं, तरीही कलर्स मराठी च्या टीमनं घेतलेली मेहनत आणि कलर मराठीच्या प्रेक्षकांमुळे गेल्या 05 वर्षात अखंडपणे 1700 भाग करण्यात यश आलं आहे. त्यात स्वामी भक्ती घरा-घरापर्यंत नेण्याचं माध्यम बनता आल्याचं छान वाटतं, असं प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी दत्त जयंतीदिनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.

दत्त जयंतीच्या मुहूर्तावर कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी एक भव्य-दिव्य, भावपूर्ण आध्यात्मिक कथा दत्तजयंती विशेष सप्ताहाच्या स्वरूपात घेऊन आली आहे. याच दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी स्वामींचं कृपावस्त्र घालून अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले यांनी अक्षय मुडावदकर यांचं स्वागत केलं. 

गुरुवारी, 04 ते 10 डिसेंबर दरम्यान रात्री ८ वाजता प्रसारित होणारे हे विशेष भाग स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य, त्यांच्या भक्त कृपा, लीला आणि ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांच्या शक्तींचा एकत्रित अनुभव साकार करतील. दत्त म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार यांचा परम संगम आणि या तीन शक्तींचं दिव्य प्रगटीकरण प्रेक्षकांना प्रथमच एका सलग कथेत आठवडाभर विस्ताराने अनुभवायला मिळणार आहे.

या विशेष अनुभवाबद्दल बोलताना अक्षय मुडावदकर म्हणाले, “स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनात अपरंपार समाधान आणि ऊर्जा मिळते. प्रेक्षकांकडून आणि स्वामी भक्तांकडून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळालाय. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की, त्यांच्या कृपेचा स्पर्श नक्कीच लाभतो. 

आज माझ्या हस्ते प्रसाद वितरण झालं, वातावरण संपूर्ण भक्तिमय होतं. दत्त जयंतीच्या दिवशी हा सुवर्ण योग आला, मी अक्षरशः भावनेने भारावून गेलो. स्वामी समर्थ महाराजांचा सदैव ऋणी आहे, यंदा स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य आम्ही मालिकेत उलगडणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर हा योग जुळून येणे अलौकिक गोष्ट आहे” 

ही विशेष कथा रंजना नावाच्या एका तरुणीच्या संघर्षमय आयुष्याभोवती फिरते, जिथे काका-काकूंचा छळ, भावाचा जीवघेणा आजार आणि गावगुंड अभिरामच्या अत्याचारामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं दिसतं. 

आजच्या काळाचे प्रतिबिंब असलेल्या रंजनाच्या असहाय हाकेला स्वामी कसे उत्तर देतात आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ तीन रूपांत कसे प्रकट होतात - ब्रह्मरूप प्रजापती, विष्णूरूप नारायण आणि रुद्ररूप महेश या रूपात वेगवेगळे येण्याचे त्यांचे प्रयोजन काय ? उत्पत्ती, पालन आणि संहार तत्त्वाच्या या तिन्ही दैवी शक्ती एकत्र आल्यानंतर घडणारा चमत्कार नेमका काय असेल याची उत्तरे या दत्तजयंती विशेष सप्ताहात मिळणार आहेत. 

अध्यात्म, भक्ती, चमत्कार आणि मानवी भावनांचा सुंदर संगम असलेले हे विशेष भाग प्रेक्षकांना श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेची दिव्य अनुभूती देतील, असंही अक्षय मुडावदकर यांनी शेवटी सांगितलं.

तेव्हा ‘जय जय स्वामी समर्थ दत्तजयंती विशेष’, 

04 ते  10 डिसेंबर, रात्री 08.00 वाजता, 

फक्त कलर्स मराठीवर...

.... चौकट

जवळपास 200 हून अधिक गरजू ज्येष्ठ नागरिकांना महाप्रसादासाठी खास आमंत्रण 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, जवळपास 200 हून अधिक स्थानिक निराधार अन्  गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या भोजनाच्या डब्याची सोय करतंय. त्याची गुरु दत्त जयंतीदिनी चौथी वर्षपूर्ती होतेय. त्याचा आम्हाला अत्यानंद होतोय. या सर्व गरजवंतांना स्वामी मंदिराच्या अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी खास आमंत्रित केलंय, असं अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले. 

सर्व आमंत्रितांना अक्षय मुडावदकर आणि अमोल राजे भोसले यांच्या हस्ते महाप्रसाद तसंच थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटरचंही वाटप करण्यात आलं.

To Top