सोलापूर : मोहोळ तालुक्यातील येवती येथील पाटोळे परिवाराविरूध्द दाखल गुन्ह्यात वैद्यकीय पुराव्याने ॲट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा उघडकीस आला. ॲट्रासिटी खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश जयदीप मोहिते यांचे न्यायालयात झाली. न्यायालयाने बाळासाहेब पाटोळे व त्यांच्या कुटुंबियांची ॲट्रासिटी प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली.
येवती येथे 05 ऑगस्ट 2020 रोजी घरासमोरील अंगणातील फुल तोडण्याचे कारणावरुन झालेल्या वादातून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करुन खुरप्याने मारहाण केल्याच्या आरोपावरुन बाळासाहेब रामचंद्र पाटोळे (वय-55 वर्षे) त्यांची पत्नी सौ. संगीता (वय-50 वर्षे) व उच्च शिक्षित मुलगा महेश यांच्याविरुध्द उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांनी सोलापुरातील विशेष न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
घटनेदिवशी फिर्यादी आपल्या घरासमोरील अंगणातील झाडांची फुले तोडत असताना आरोपी महेश याच्याबरोबर तिची भांडणे झाली. त्या भांडणात आरोपी महेश याने खुरप्याने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली, असं सरकार पक्षाचे म्हणणे होते.
फिर्यादीला ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले त्यावेळी तपासणीदरम्यान तिने वैद्यकीय अधिकाऱ्याला तिला दगडाने मारहाण झाली, असे सांगितले होते. तपासणीनंतर मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये तिला खुरप्याने मारहाण झाली, असा आरोप तिने केला होता.
वैद्यकीय पुराव्यावरुन तिला झालेली जखम कापीव हत्याराने झालेली नाही, असे स्पष्टपणे दिसुन येते. वैद्यकीय पुरावा व प्रत्यक्ष पुरावा हा एकमेकांच्या विरोधात आहे, त्यामुळे वैद्यकीय पुराव्याशी विसंगत असलेल्या साक्षीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. 
वैद्यकीय पुरावा फिर्यादीच्या साक्षीस विसंगतीपूर्वक असल्याने न्यायाधिशांनी पाटोळे कुटूंबियांची निर्दोष मुक्तता केली. या सुनावणी दरम्यान फिर्यादीच्या मुलाने न्यायालयात दिलेल्या साक्षीत आपल्या समक्ष कोणतीही घटना घडली नाही, अशी साक्ष देऊन आईने आरोपीविरुध्द केलेल्या आरोपाला दुजोरा देण्यास नकार दिला, हेही विशेष आहे.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने ,ॲड. प्रणित जाधव, ॲड. श्रीहरी कुरापाटी, ॲड. रियाज शेख (मोहोळ), ॲड. किरण गवळी यांनी काम पाहिले.
