सोलापूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ मधील न्यू हायस्कूल सलगरवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर सचिव तथा माजी सहाय्यक प्रकाश राठोड यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याकरिता प्रकाश राठोड यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. इयत्ता 05 वी ते 10 वीतील 250 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून कल्पकता, सर्जनशीलता आणि कलाविष्काराचे प्रभावी प्रदर्शन केले.
पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येकी 03 विजेते ठरविण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि विशेष प्रोत्साहन देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देण्यात आली.
या प्रसंगी गायक आकाश चव्हाण यांनी आई वरती गीत सादर करून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. तर सामाजिक कार्यकर्ते मिथुन राठोड यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. 
दरम्यान विद्यार्थ्यांच्या कला‐गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात असे प्रतिपादन प्रकाश राठोड यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदनपर कौतुक करत माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांचे देखील आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हनमुरे सरांनी केले तर शिक्षक राहुल पोटपुडे यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

