वि‌द्यापीठातील वि‌द्यार्थ्यांना एआय शिकण्याची सुवर्णसंधी

shivrajya patra

कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स मुंबई यांच्याशी कौशल्य विकास केंद्राचा सामंजस्य करार

सोलापूर : शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठाने आपल्या वि‌द्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यापीठातील कौशल्य विकास केंद्र आणि कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

या करारानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महावि‌द्यालयातील हजारो वि‌द्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या उदयोन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी  उपलब्ध झाली आहे. जगातील प्रत्येक उ‌द्योग आता डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या नवीन युगाचे केंद्रस्थान आहे. 

ऑटोमेशन, डेटा  ॲनालिसिस, निर्णय प्रक्रिया आणि अगदी कला-साहित्य निर्मितीपर्यंत एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या महत्त्वपूर्ण बदलाची गरज ओळखून, या सामंजस्य करारानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एआय क्षेत्राती सर्टिफीकेट कोर्स इन मशिनलर्निंग, सर्टिफीकेट कोर्स इन जनेरेटिव्ह एआय, सर्टिफीकेट कोर्स इन डिपलर्निंग कोर्स शिकता येणार आहेत. 

यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठाचे ध्येय केवळ परीक्षा घेणे आणि पदवी देणे इतकेच मर्यादित नाही, तर आमच्या वि‌द्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे हे आहे. 

आजचे युग हे एआयचे आहे. जिथे एआय आणि ऑटोमेशनचा बोलबाला आहे. कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स, मुंबई संस्थेशी करार करून वि‌द्यार्थ्यांना एआयचे प्रशिक्षण देत आहोत. हे कोर्सेस सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, रोजगार आणि उद्‌द्योजकता या त्रिसूत्रीवर आधारित भविष्याची गुरुकिल्ली ठरतील.

यावेळी कौशल्य विकास केंद्रांचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, आज बाजारपेठेत केवळ पारंपारिक ज्ञान पुरेसे नाही. तुमच्या पदवीला एआय आणि डेटा सायन्ससारख्या आधुनिक कौशल्यांची जोड देणे अत्यावश्यक आहे. कॉप्युक्स टेक्नॉलॉजी सारखी संस्था या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे आणि त्यांच्या तज्ज प्रशिक्षकांकडून हे कोर्स शिकण्याची संधी वि‌द्यार्थ्यांना प्रथमच मिळत आहे. जास्तीत जास्त वि‌द्याथ्यांनी एआय सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधीकारी महादेव खराडे, विद्याधर कुलकर्णी, मयूर जव्हेरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, कायदा अधिकारी अॅड. जावेद खैरादी अमोल खंडागळे आदी उपस्थित होते.

To Top