सोलापूर : वाचलेली एैकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे अशी गझल सादर करून गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंग मंचावर शब्द सुरांची भावयात्रा सजवली.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवशीय गझल महोत्सवाच्या दुसर्या दिवशी गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे- गायकवाड यांनी गझल सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.
हे का कुणी फुलांना सांगायला हवे, स्वच्छंद वादळात कागदाची नाव आहे. ही गझल भीमराव पांचाळ यांनी तर आसवांचे जरी हसे झाले ही गझल सादर करून डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी रसिक श्रोत्यांची चांगलीच दाद मिळवली.
गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या नावाचा पुरस्कार नुकताच गझलनवाज भीमराव पांचाळे यांना मिळाला आहे तसेच त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी लहानपणापासूनच गझल आणि गायनाचा सराव करीत चार महान गायकांवर त्यांनी पीएचडी मिळवली. 
या दोन्ही पिता पुत्रीकडून सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंगमंचावर गझल मैफल चांगलीच रंगवली त्यांना तबलावर साथ संगत केली होती गिरीश पाठक तर हार्मोनियम ओंकार सोनवणे, संतूर प्रशांत अग्निहोत्री यांनी वादन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि हलके फुलके वातावरण करीत निवेदन केले होते, किशोर बळी यांनी. ही शब्द सुरांची भावयात्रा सादर होत असताना त्याला रसिकांनी मोठी दाद दिली.
मध्यांतरानंतर सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या हस्ते सर्व कलावंताचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले.यावेळी सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, समन्वयक अमोल धाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक विभिषण चवरे यांच्या प्रयत्नातून हा तीन दिवशीय गझल महोत्सव सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झाला. रसिक श्रोत्यांनी या आजच्या दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी केली होती.
बुधवारी, 05 नोव्हेंबर रोजी सोबतीचा करार या कार्यक्रमात कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे यांचा कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे.
(छायाचित्र - नागेश दंतकाळे)
