सोलापूर : तू आलीस की समुद्र होतो माझा तू गेलीस की वाळू होते.. तुझे चालले होते कख शिकणे तेव्हा माझे बीए चालू होते. अशा विविध गझला आणि गीते हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंग मंचावर सादर करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय गझल महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी, 03 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राध्यापिका नसिमा पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, समन्वयक अमोल धाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मी उगाच मुंबईत काढला बराच काळ पण पुण्यात प्रेम लागले मिळायला. असे बालपण नव्हते माझे कोणीही येवून मुका घ्यावा, असे गालपण नव्हते माझे. जीव घेणारी तुझी स्पर्धा जिथे मी येत आहे दुसरा. नको नको ते करून बसलो आहे आयुष्यात उठून बसलो आहे. अशी गझल आणि गीत कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझेच आहे, यामध्ये अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे यांनी सादर केले. तर संगीत संयोजन राग आणि प्रकाश योजना ईशान-गार्गी यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात गझल रंग यामध्ये वीनल देशमुख, तुप्ती दामले आणि उमेश साळंखे यांनी कार्यक्रमात बहार आणली.
प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे गीत सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना प्राध्यापिका नसिमा पठाण यांनी गझल दीप आहे, श्वास आहे, विश्वास आहे असे सांगून सोलापूर मध्येही अनेक गझलकार आहेत आणि त्यांचे गझल सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. इरेश स्वामी यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.
अलीकडच्या पिढीला गझलची अधिक माहिती आहे. गझल अधिक कळते अशी पिढी आजही आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभीच सानप यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी आभार व्यक्त केले. 
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक विभिषण चवरे यांच्या प्रयत्नातून हा तीन दिवसीय गझल महोत्सव सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झाला. रसिक श्रोत्यांनी या आजच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी केली होती.
मंगळवारी,04 नोव्हेंबर रोजी गझलनवाज पंडीत भीमरावर पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांचा कार्यक्रम होणार आहे.
