डॉक्टर व्हायचं होतं पण झालो वकील : पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम

shivrajya patra

प्रकट मुलाखतीमधून अ‍ॅड. उज्वल निकम यांनी उलगडला जीवन प्रवास

सोलापूर : आईची इच्छा होती, मी डॉक्टर व्हावे म्हणून प्रयत्न केला, परंतु अवघ्या 2 मार्काने माझी डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण वडीलांच्या इच्छेने मी वकील झालो. असे सांगून विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्वल निकम यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बुधवारी शिवछत्रपती रंगभवनमध्ये आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. घरात वडील बॅरिस्टर होते, म्हणून वडीलांची इच्छा होती की, मी वकील व्हावे, पण माझी इच्छा नव्हती. सहकाराच्या एका खटल्याने वकीलीची सुरूवात झाली. जळगांव येथील खटल्यातून मला मुंबई बॉम्बस्फोटात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

जळगांव ते मुंबई असा प्रवास करत असताना अनेक संवेदनशील आणि महत्वाच्या खटल्यात सरकारची बाजू मांडून गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात यश आले. त्यातच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडता आली. माझी भावना नेहमी माझा देश प्रथम अशीच आहे, म्हणूनच दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत आणि पाकीस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यापर्यत यश मिळाले.

संजय दत्त आणि 93 चा बॉम्बस्फोट या प्रश्‍नावर ते म्हणाले, संजय दत्त याने जर आधीच सुरक्षा यंत्रणांना सांगितले असते, तर बॉम्बस्फोट झाले नसते. नेता असो की अभिनेता खोटी गांधीगीरी पांघरून पाप धुता येत नाही. आंतकवादाला कोणताच धर्म नसतो, असेही ते म्हणाले. कसाब आणि बिर्याणी हे केवळ एक वकीली युक्तीवाद होता. मिडिया ट्रायलचा न्यायाधीशावर परिणाम होत नाही, असे माझे मत आहे.

तरूण वकीलांनी कायद्याचा चांगला अभ्यास करावा, नेहमी सत्य सांगावे, कायद्याचे संरक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी एका प्रश्‍नावर दिला. निरपेक्ष आणि निधर्मी भावनेतूनच खरा न्याय मिळतो.

निवडणुकीला उभा राहणे ही चूक का या प्रश्‍नावर ते म्हणाले. अवघ्या 10 दिवसापुर्वी निवडणुकीला उभे राहण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे तयारी नव्हती तरीही निवडणूक लढवली जर माझा मतदारसंघ तुरूंग असता तर मी इतर कोणालाही पराभूत केलो असतो, असे ते गंमतीने म्हणाले. मी स्वतःला डॉन समजतो, मी बलवान आहे. अनेक गुन्हेगार मला घाबरतात, असेही ते म्हणाले.

कुटुंबाला वेळ देता का या प्रश्‍नावर ते म्हणाले, माझा देशच माझे कुटुंब आहे. जळगांवपासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास मुंबई आणि आता राज्यसभेचा खासदार असा यशस्वीपणे सुरू आहे यामध्ये मी समाधानी आहे असेही ते म्हणाले. तब्बल दीड तास सुरू असलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये माधव देशपांडे यांनी अनेक महत्वाचे प्रश्‍न विचारत निकम यांना बोलते केले. पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम यांनीही प्रत्येक प्रश्‍नाला दिलखुलासपणे उत्तरे दिली.

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार व्यक्त केले. उज्वल निकम आणि माधव देशपांडे यांचा परिचय अविनाश महागांवकर यांनी केला. नंतर अ‍ॅड. उज्वल निकम यांच्यावरील चित्रफित दाखवण्यात आली. नंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी यांच्या हस्ते अ‍ॅड. उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माधव देशपांडे यांचा सत्कार इंद्रजीत पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी मसापचे अध्यक्ष प्रा. दीपक देशपांडे, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष अमोल धाबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर यांच्यासह जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, योग शिक्षिका सुधा अळ्ळीमोरे, आदींसह अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं श्रोते उपस्थित होते.

(फोटो - नागेश दंतकाळे)

To Top