हल्ली पक्षनिष्ठा असणारे कमी आहेत. सर्वांना सत्तेची लालसा लागली आहे. सत्ता असेल त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. राष्ट्रवादीमधीलसुद्धा अनेकांनी पक्ष सोडून अन्य पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे, परंतु जाणारे जात असतात अन् येणारे येत असतात, असं शहराध्यक्ष गादेकर यांनी प्रारंभीच म्हटले.
आयाराम-गयाराम यांच्यामुळे कोणत्याही पक्षाचे फारसे नुकसान होत नाही. सोलापुरात अनेकांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला असल्याने काहीसा परिणाम झाला असला तरी पक्षनिष्ठा कायम असणारेसुद्धा खूप आहेत.
तरुण-निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत निश्चित विचार केला जाणार असल्याचे सांगत, २०१२ च्या महापालिका निवडणुका आपल्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर जवळपास १७ नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीत हा आकडा वाढलेला दिसेल असेही, गादेकर यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अगदी कमी वेळ मिळाला आहे. सोलापूर शहरात शरद पवार यांना मानणारा व त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याने तसेच नव्या-जुन्याचा समन्वय साधून महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असंही गादेकर म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षात लगेच कोणालाही कोणते पद मिळत नाही, कार्यकर्ता म्हणून काम करावे लागते. आपण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर शहराध्यक्षपदही यापूर्वी भूषविले आहे. शिवाय विधानसभा निवडणूकसुद्धा लढविली असल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्यावर जबाबदारी दिली आहे. जबाबदारी आपण जोमाने पार पाडणार आहोत, असेही ते म्हणाले.
शिव-शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करत आहे. सर्वांना सोबत घेऊन आपण निवडणूकीला सामोरे जाणार आहोत, असं नूतन शहराध्यक्ष गादेकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगून राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्यांना म्हणजेच निवडून येण्याचा निकष बघूनच पक्षात घेतले जाईल, परंतु निवडणुकीत तरुणांना जास्तीत-जास्त संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पद्माकर काळे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाला फटका बसला काय ? यावर बोलताना गादेकर म्हणाले, निश्चितच बसला आहे. चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला आहे. त्याठिकाणी चांगला पर्याय देणार असल्याचे गादेकर म्हणाले.
सोलापूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना ज्या पद्धतीने शहराचा विकास होणे आवश्यक होते, तसा विकास झालेला नाही. दोन आमदारांच्या भांडणात सोलापूरचा विकास खुंटला असल्याचे सांगत, सोलापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटीबद्ध असल्याचेही महेश गादेकर म्हणाले.
यावेळी शंकर पाटील, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, अॅड. उमरखा बेरिया, रियाज खैरदी, दिनेश शिंदे, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, अक्षय बचुटे, सुनीता रोटे, मनोज गादेकर आदी उपस्थित होते.
