सोलापूर : पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला जणू काळीमा फासणारी घटना मालेगाव इथं घडलीय. डोंगराळे येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार अन् हत्येच्या निषेधार्थ छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिव प्रताप चौक (आसरा चौक) येथे तीव्र निदर्शने करून चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्या चिमुरडीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या बालिकेचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करून अत्याचाराला बळी पडलेल्या तसेच त्यातून जीवाला मुकलेल्या बाळाला न्याय द्या, या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे लेकी-बाळी असुरक्षित असून आता आपली रक्षा स्वतःच केली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून गुन्हेगारीच्या घटनात कुप्रसिध्द अशा राज्यांच्या पंगतीला महाराष्ट्र जातोय की काय अशी भिती निर्माण झालीय.
असा अमानुष आणि निर्दयी प्रकार विधीमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून बसलेल्या चेहऱ्यांच्या नात्यांशी घडला असता तर संपूर्ण मंत्रिमंडळ पेटून उठले असते, असा आरोप छत्रपती ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी करून महिला अत्याचाराच्या प्रकरणी नवीन अति जलद न्यायालयाची निर्मिती करून असा खटला निकाली काढून आरोपींना एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा तामिळनाडूसारखे तात्काळ इनकाऊंटर करून जलद न्याय द्यावा, अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
