सोलापूर : सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ-सोलापूर शाखेतर्फे आयोजित 26/11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मागील 17 वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जाणारे 17 वे वार्षिक रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात 45 हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
या वर्षी 09 वे व 38 वे एनसीसी बटालियन तसेच संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी, विशेषतः महिला कॅडेट्सनी, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्साहाची जोड दिली. कार्यक्रमात 09 व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ले. कर्नल बाबर यांनी भेट देऊन कॅडेट्सचे कौतुक केले.
अनेक सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेचे सदस्य आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गंगाधर थळंगे, संजय बुरगुटे, नागेंद्र कोंडेकर, कर्नल सुमित मार्तेंडे, रवी गायकवाड, दिगंबर, पोपट शिंदे, किरण कुलकर्णी, कबाडे, अनिल सगर, राजेंद्र पंडित तसेच सोलापूर शाखेतील सर्व माजी विद्यार्थी संघ सदस्यांनी मोलाचे प्रयत्न केले. तसेच 09 वे व 38 वे एनसीसी बटालियनच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाचे सहकार्यही उल्लेखनीय होते.
विशेष म्हणजे, रक्तपेढीने (Damani Blood Bank) शिबिराचे आणि सर्व स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत हा उपक्रम अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पडल्याचे सांगितले.
सोलापूरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी झाले, असे आयोजकांनी सांगितले.
