सोलापूर : संघटित गुन्हेगारी टोळीतील आरोपी टोळी प्रमुख वसीम ऊर्फ मुकरी अ.रहिम सालार, टोळी सदस्य फैसल अ. रहिम सालार आणि टोळी सदस्य जाफर म. युसुफ शेटे यांच्याविरूध्द मोक्का कायद्यांतर्गत दोषारोप पाठविण्याची परवानगी राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी दिलेली आहे. या आरोपींविरूध्द लवकरच दोषारोप पत्र सादर करण्यात येणार असल्याचं शहर पोलिसांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितलंय.
एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील भारतीय न्याय संहिता कलम 109,189 (1), 189 (2), 189(4), 191(1), 191(2), 191(3), 190, 351(2) (3), 49 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135,142 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात, गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड आणि वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांच्याविरुद्ध सन 2015 पासून मागील 10 वर्षांत, संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने, स्वतःच्या अथवा टोळीच्या अवैध आर्थिक फायद्यासाठी, तसेच परीसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी, हिंसाचाराचा (बळजोरी-Violence) चा वापर करुन, 03 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे 07 दखलपात्र गुन्हे आहेत.
या गुन्ह्यातील वर उल्लेखित आरोपी एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, पोलीस आयुक्त, एम. राज कुमार यांनी, 21 जुलै 2025 रोजी, सालार टोळीविरूध्द, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (i), 3(2), 3(4) हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे.
त्यानुसार, या गुन्ह्यामध्ये, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii),3(2),3(4) या कलमांची (मोक्का कायद्याची) वाढ करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) सोलापूर शहर यांनी केला असून, गुन्ह्याचे तपासाअंती नमूद आरोपींविरूध्द दोषारोप पत्र पाठविण्यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 23 (2) नुसार अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म.रा.मुंबई यांची परवानगी घेणे क्रमप्राप्त होते. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्या मार्फतीने राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्या कार्यालयास सादर केला होता.
या प्रस्तावाचे अवलोकन करून अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी संघटित गुन्हेगारी टोळीतील आरोपी वसीम ऊर्फ मुकरी अ.रहिम सालार, फैसल अ. रहिम सालार आणि 3) जाफर म. युसुफ शेटे यांच्याविरूध्द मोक्का कायद्यांतर्गत दोषारोप पाठविण्याची परवानगी दिलेली असून त्यांच्याविरूध्द लवकरच दोषारोप पत्र सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
